वाशिम जिल्ह्यातील पंचायत समित्या वा-यावरच!
By admin | Published: October 29, 2014 01:33 AM2014-10-29T01:33:24+5:302014-10-29T01:33:24+5:30
वाशिमच्या रोहयो कक्षाला कुलूप : कारंजा पंचायत समितीचा शिक्षण विभाग रामभरोसे.
वाशिम : दिवाळीच्या सलग सुट्टय़ांनंतर सोमवार, २७ ऑक्टोबरपासून प्रशासकीय कामकाज पूर्ववत झाले खरे; मात्र अधिकारी व कर्मचार्यांचा सलग सुट्टय़ांची नशा त्यानंतरही उतरली नसल्याचेच २७ व २८ ऑक्टोबर रोजी ह्यलोकमतह्ण चमूने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा व मंगरुळपीर या सहाही पंचायत समितींमध्ये अधिकारी-कर्मचार्यांनी दांडी मारल्याचे चित्र लोकमत चमूच्या कॅमेर्यात कैद झाले.
दिवाळीच्या सणानिमित्त २३ ते २६ ऑक्टोबर अशी सलग सुट्टी शासकीय अधिकारी-कर्मचार्यांना उपभोगता आली. २७ ऑक्टोबरपासून प्रशासकीय कामकाज पूर्ववत झाले. दीर्घ सुट्टय़ांनंतर प्रशासकीय कामकाजाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सहाही पंचायत समिती कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचार्यांची हजेरी कशी राहील, याचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमत चमूने केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. २७ ऑक्टोबर रोजी मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, वाशिम या पंचायत समितींमधील बहुतांश खुच्र्या रिकाम्या असल्याचे आढळून आले. कामानिमित्त ग्रामीण भागातून मोठय़ा अपेक्षेने नागरिक आले होते; मात्र अधिकारी-कर्मचार्यांची नगण्य उपस्थिती नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्यास पुरेशी ठरली. २८ ऑक्टोबर रोजी वाशिम, कारंजा व रिसोड पंचायत समितीमधील कामकाजाच्या हालचाली टिपण्यात आल्या. कारंजा येथील विविध विभाग वार्यावर असल्याचे प्रकर्षाने जाणवले. रिसोड पंचायत समितीमध्ये रिकाम्याच खुच्र्या दिसून आल्या. वाशिम पंचायत समितीमध्ये तर धक्कादायक प्रकार पंचायत समितीच्या सदस्यांनीच समोर आणला. वाशिम पंचायत समितीच्या महात्मा गांधी रोजगार हमी कक्षाला कुलूप असल्याचे आढळून आले. अधिकारी-कर्मचार्यांची ह्यदांडीह्ण मारणे ही बाब नित्याचीच झाली असल्याचे लोकमतच्या पाहणीतून समोर आले.
*रिसोड पंचायत समिती
रिसोड पंचायत समितीमधील अधिकारी-कर्मचार्यांची नगण्य उपस्थिती ही बाब नित्याचीच झाली आहे. अधिकारी व कर्मचार्यांची कार्यालयीन हजेरी तपासण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारीही दोन महिन्यांपूर्वी रिसोड पंचायत समितीला भेट देऊन गेले होते. त्यावेळीही अशीच परिस्थिती होती; मात्र अद्यापही या परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.
*कारंजा पंचायत समिती
कारंजा पंचायत समितीमध्ये २८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास फेरफटका मारला. यावेळी कृषी विभागात कर्मचारी आढळून आले; तसेच गटविकास अधिकार्यांच्या कक्षात गटविकास अधिकारी असल्याचे दिसून आले; मात्र शिक्षण विभागात कुणीच नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. माहिती घेतली असता गटशिक्षणाधिकारी व अन्य तीन कर्मचारी वाशिमला बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. अन्य कर्मचार्यांनी मात्र दांडी मारली.
*मंगरूळपीर पंचायत समिती
मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये २७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास फेरफटका मारला. यावेळी गटविकास अधिकारी वेले त्यांच्या कक्षात नसल्याचे दिसून आले. विभागप्रमुखच नसल्यामुळे अन्य विभागातही कर्मचार्यांनी कार्यालयीन उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. याबाबत वेले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही.
मालेगाव पंचायत समिती
*मालेगाव पंचायत समितीमध्ये सलग सुट्टय़ांनंतर येणार्या प्रशासकीय कामकाजाच्या पहिल्या दिवशी अर्थात २७ रोजी पाहणी करण्यात आली. यावेळी पं.स. सभापतींचा कक्ष तसेच काही कक्षात काही कर्मचारीही उपस्थित नसल्याचे दिसून आले. मानोरा पंचायत समितीची गत यापेक्षा वेगळी नाही. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो.