नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड!
By Admin | Published: June 6, 2017 01:09 AM2017-06-06T01:09:46+5:302017-06-06T01:09:46+5:30
एसएमसी इंग्लिश स्कूलचा उपक्रम : उद्यानाची केली निर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रदूषणाचा भस्मासुर पृथ्वीला गिळू पाहत आहे. पर्यावरणाच्या समस्येने सर्वत्र उग्ररूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण आवश्यक बनले आहे. या संबंधात समाजाला जागृत करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून एस.एम.सी इंग्लिश स्कूलच्यावतीने संस्थाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतून इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नक्षत्र व राशी उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, नक्षत्र आणि राशीनुसार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने खैर, जांभूळ, उंबर, आवळा, कुचला, मोहा, कडुनिंब, आंबा, कदंब, शमी, रुई, फणस, नागचाफा, सांबर अशा झाडांची लागवड करून जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीधारीलाल सारडा होते.
वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रा.डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. नागेश्वर कनाके, प्रा. प्रकाश राठोड, प्रा. गजानन वाघ, प्रा. रमेश मुंदडा, प्रा. सुनील उज्जैनकर, प्रा. मेघा देशमुख, प्रा.डॉ. शुभांगी दामले, अस्मिता वानखडे, स्मिता पाटील, अनघा जोशी, सुनीता बोरकर, प्रमोद खासबागे, राठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. नक्षत्र व राशी उद्यान निर्मितीला इको क्लबचे विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, हे उद्यान सर्वांच्या आकर्षणाचे कें द्र ठरले आहे. शाळेच्या हरित सेनेच्या उपक्रमाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांनी केले आहे.
--