रिसोड तालुक्यातील पुनर्वसित बिबखेडा गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:53 PM2018-01-29T17:53:27+5:302018-01-29T17:55:32+5:30

Rehabilitated Bibkheda village in Risod taluka has no basic amenities | रिसोड तालुक्यातील पुनर्वसित बिबखेडा गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा नाहीत

रिसोड तालुक्यातील पुनर्वसित बिबखेडा गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा नाहीत

Next
ठळक मुद्देपळसखेड सिंचन प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून गावातील २४८ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत.सिंचन प्रकल्प उभा होवून आजमितीस ११ वर्षाचा मोठा कालावधी उलटला तरी देखील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्यांची कामे रखडली आहेत. प्लॉटचे नंबर न मिळाल्याने कोणता प्लॉट कुणाचा, हे कळायला मार्ग राहिला नाही.

रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंधारे विभागाकडून पळसखेड सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे बिबखेडा हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून गावातील २४८ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत. तथपि, सिंचन प्रकल्प उभा होवून आजमितीस ११ वर्षाचा मोठा कालावधी उलटला तरी देखील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्यांची कामे रखडली आहेत. 
गावात शासनाकडून मिळालेल्या जागेवर धरणग्रस्तांनी पक्की घरे बांधली आहेत. या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आला; परंतु त्यात कधीच पाणी राहत नाही. गावात काहीठिकाणी रस्ते उभारण्यात आले. मात्र, सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यात कुठलीच ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. गावातील लहान मुलांसाठी अंगणवाडीची इमारत नाही. त्यामुळे ती एका सामाजिक सभागृहात भरवावी लागत आहे. प्रशासनाने गावात स्मशानभुमी दिली; पण ती एका शेतकºयाच्या शेतात बांधण्यात आली असून ती जागा देखील धरणासाठी संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावात कुणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार नेमके कुठे करावे, हा प्रश्न गावकºयांना भेडसावत आहे. गावातील नागरिकांना शासकीय जागेवर घर बांधण्यासाठी प्लॉट देण्यात आले. मात्र, प्लॉटचे नंबर न मिळाल्याने कोणता प्लॉट कुणाचा, हे कळायला मार्ग राहिला नाही. एकूणच या सर्व समस्यांमुळे बिबखेडा येथील धरणग्रस्त नागरिक पुरते वैतागले आहेत.


प्रशासकीय इमारती हस्तांतरणाचा प्रश्न रखडला!
पुनर्वसीत बिबखेडा येथे नव्याने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि सामाजिक सभागृहाची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत या इमारती ताब्यात घेतल्या जाणार नाहीत, अशी भूमिका बिबखेडा ग्रामपंचायतीने घेतली आहे. 


बिबखेडा या गावातील ३५० घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून या घरांना बहुतांश सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार प्लॉट वाटप करून इसारपट करून देण्याची कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे. उर्वरित सुविधा ग्रामपंचायतीने प्रशासकीय इमारती ताब्यात घेतल्यानंतर पुरविल्या जातील. 
- शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, वाशिम

Web Title: Rehabilitated Bibkheda village in Risod taluka has no basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम