SSC Result 2019: दहावीच्या निकालात वाशिम जिल्हा विभागात व्दितीय क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:02 PM2019-06-08T15:02:34+5:302019-06-08T15:06:19+5:30
वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के लागला असून अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने यंदा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहिर झाला. त्यात वाशिम जिल्ह्याचा निकाल ७५.३१ टक्के लागला असून अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ४३२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७५.३१ अशी आहे. उत्तीर्ण १५ हजार १३० विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ९०२ मुले व ७ हजार २२८ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ७०.३२; तर मुलींच्या उत्तीर्ण होण्याची सरासरी टक्केवारी ८१.६६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवत बाजी मारली.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ८१.२७ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ७८.६२ टक्के, मालेगाव तालुका ६४.४० टक्के, कारंजा तालुका ७४.५८ टक्के, मंगरूळपीर तालुका ७३.३१ टक्के आणि मानोरा तालुक्याचा निकाल ७२.०९ टक्के लागला आहे.