वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकर्याची आत्महत्या सावकारांच्या तगाद्याने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:44 AM2017-12-09T00:44:50+5:302017-12-09T00:54:42+5:30
मानोरा (वाशिम): तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार, त्यांच्या मुलाने पोलिसांत दिल्याने सोयजनाच्या नवनिर्वाचित सरपंचासह तिघांवर ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून, सरपंचासह दोघांना अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार, त्यांच्या मुलाने पोलिसांत दिल्याने सोयजनाच्या नवनिर्वाचित सरपंचासह तिघांवर ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून, सरपंचासह दोघांना अटक करण्यात आली.
मानोरा तालुक्यातील सोयजना येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांनी ६ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी मृतकाचा मुलगा सागर मिसाळ यांनी मानोरा पोलिसात तक्रार दिली.
तक्रारीनुसार ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सरपंच विनोद नारायण चव्हाण, हरीअण्णा मिसाळ, मिलिंद लक्ष्मण खोब्रागडे यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्या तिघांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावून मिसाळ यांना त्रस्त करून सोडले होते.
कर्ज परतफेडीसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी अखेर आत्महत्या केली, असे सागर मिसाळने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मानोरा पोलिसांनी ितन्ही आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0६, ३४ अन्वये गुन्हा दखल केला आणि आरोपी सरपंच विनोद चव्हाण व हरीअणा मिसाळ यांना तत्काळ अटक केली, तर तिसरा आरोपी मिलिंद खोब्रागडे फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास वानखडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ठाणेदारांनाही लिहिले होते पत्र
ज्ञानेश्वर मिसाळ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण मळघणे यांनाही रजिस्टर पोस्टाने पत्र पाठविले होते. विनोद चव्हाण, हरिअण्णा मिसाळ आणि मिलिंद खोब्रागडे यांच्याकडून सतत सावकारी कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू असल्याने आपण आत्महत्या करणार आहोत, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.