वाशिम शहरातील माहुरवेश भागात सार्वजनिक विहीरीवर पाणी भरण्यास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:10 PM2018-01-12T14:10:57+5:302018-01-12T14:13:41+5:30
वाशिम - शहरातील माहुरवेश भागात असलेल्या सार्वजनिक विहीरीवर परिसरातील नागरिकांना काही लोकांकडून प्रतिबंध केला जात आहे. यामुळे नागरीकांना विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे.
वाशिम - शहरातील माहुरवेश भागात असलेल्या सार्वजनिक विहीरीवर परिसरातील नागरिकांना काही लोकांकडून प्रतिबंध केला जात आहे. यामुळे नागरीकांना विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे. तरी परिसरातील नागरिकांना या विहीरीवरुन पाणी भरण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष दिपक नामदेव साठे यांच्या नेतृत्वात ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, शहरातील माहुरवेश भागात पुरातन काळापासून विहीर आहे. काही लोकांनी या विहीरीवर अतिक्रमण करुन विहीरीचा ताबा केला आहे. पावसाळ्यात पावसाची सरासरी कमी झाल्यामुळे एकबुर्जी तलाव भरला नसून, येत्या उन्हाळ्यात भिषण पाणीटंचाईचा सामना शहरातील नागरीकांना करावा लागणार आहे. दरम्यान, माहुरवेश भागातील सार्वजनिक विहीरीतील पाणी नागरीक पिण्यासाठी व वापरण्यासाठी घेत होते. मात्र काही दिवसांपासून काही लोकांनी या विहिरीवर अनाधिकृतपणे कब्जा करुन अतिक्रमण केले आहे. व परिसरातील नागरिकांना या विहीरीचे पाणी घेण्यास आडकाठी निर्माण केली आहे. त्यामुळे माहुरवेश येथील नागरीकांना या विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे. भीषण पाणीटंचाईची चाहुल पाहता या विहीरीमुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्?न मिटू शकतो. तथापि, अनाधिकृतपणे केलेल्या ताब्यामुळे या ठिकाणी विहीरीच्या पाण्यावरुन वादावादी व भांडणे होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून माहुरवेश भागातील नागरीकांना पाणी भरण्यासाठी सदर विहीर खुली करुन द्यावी, अशी मागणी लहुजह सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याची दखल न घेतल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे शहर अध्यक्ष दिपक साठे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रणबावळे, जिल्हा संघटक महादेव आमटे, बंडु भालेराव, शहर सचिव दिनकर खडसे, सहसचिव विनोद गवळी, सदस्य शिवाजी कांबळे, शरद कांबळे, रवी खडसे आदींच्या स्वाक्षºया आहेत.