शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जाची प्रतीक्षा; धार्मिक उत्सवांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:58 AM2018-01-11T00:58:14+5:302018-01-11T00:58:27+5:30
शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणीही केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणीही केली आहे.
शिरपूर जैन येथे जैन धर्मियांचे जगविख्यात अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर आहे. या ठिकाणी विशेष उत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी असतेच, शिवाय दर्शनासाठी सतत येणार्या भाविकांची वर्षभरातील संख्या ही एक लाखापेक्षा अधिक आहे. त्याशिवाय येथे असलेल्या जानगीर महाराज संस्थानवर महाशिवरात्रीनिमित्त ७५ हजारांवर भाविक येतात. ओंकारगीर बाबा पुण्यतिथीला ५0 हजार भाविक, आषाढी उत्सवाला २५ हजारांवर भाविक येथे येतात. या ठिकाणी मुस्लीम धर्मियांचाही पवित्र मानला जाणारा मिर्झा मियॉ दर्गाह आहे. येथे उर्स उत्सवाला ६0 हजारांवर भाविक येतात. त्याशिवाय शिरपूर येथे विश्वकर्मा जयंती उत्सव मोठय़ा उल्हासात साजरा केला जातो. त्यासाठीही २0 हजार भाविक येथे येतात. बेलसरी महादेव येथील धार्मिक सोहळा, खंडोबा देवस्थानावरील धार्मिक सोहळा आणि नागनाथ देवस्थानावरील धार्मिक सोहळय़ासाठीही २५ हजारांवर भाविक या ठिकाणी येत असतात. उल्लेखनीय बाब अशी की, येत्या काही महिन्यांत या ठिकाणी भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मूर्तीची भव्य अशी प्रतीकृती पारसबाग परिसरात स्थापित करण्यात येणार आहे. तब्बल दोन हजार कारागीर ही मूर्ती घडविणार असून, ही मूर्ती घडविण्यासाठी तब्बल ९0 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर राजस्थानमधून येथे काळय़ा पाषाणाची भव्य शिळा आणली आहे. राज्यातील भगवान पार्श्वनाथांची ही एकमेव मूर्ती ठरणार असल्याने येथे देशभरातील जैन बांधव दर्शनासाठी येणार आहेत.
शिरपूर जैन हे देशभर प्रसिद्ध असलेले सर्व धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षाकाठी विविध धर्माचे चार लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. येथील रस्ते रुंद, सुसज्ज असणे, पार्किंगसाठी भव्य असे मैदान असणे, भाविकांच्या वास्तव्याची सोय असणे गरजेचे आहे. यासाठी या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे करीत आहोत. ती मंजूर झाल्यास या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळेल आणि भाविकांसाठी सुविधा उपलब्ध होतील.
-शबानाबी मोहम्मद इमदाद, जिल्हा परिषद सदस्य, शिरपूर.