तुरीने भरली गोदामे; सोयाबीन साठविण्याची अडचण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:20 AM2017-11-22T02:20:32+5:302017-11-22T02:23:47+5:30
नाफेडमार्फत जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकर्यांचा माल मोठय़ा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रांवर येत आहे. आता खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी शासकीय गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: नाफेडमार्फत जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, शेतकर्यांचा माल मोठय़ा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रांवर येत आहे. आता खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी शासकीय गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने प्रशासनाची मोठी पंचाईत झाली आहे. अचानक सोयाबीनची आवक मोठय़ा प्रमाणात झाल्यास पुन्हा खरेदी बंद पडण्याची भीती त्यामुळे निर्माण झाली आहे.
यंदा अपुरा पाऊस पडल्याने शेती उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर बाजारात सोयाबीनसह इतर शेतमालास हमीभाव मिळेनासे झाले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात नाफेडद्वारे खरेदी करण्याबाबत शासनाने कडक आदेश जारी केले. त्यानंतर जिल्ह्यात नाफेडद्वारे उडीद, मुगाची खरेदीही सुरू करण्यात आली आणि आता मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या खरेदीलाही सुरुवात झाली. काही अपवादात्मक स्थिती वगळता रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि वाशिम येथील शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीनची आवक वाढत आहे; परंतु खरेदी केलेले सोयाबीन साठविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत पुरेशी जागाच नसल्याने ही खरेदी अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी वाशिम जिल्ह्यात विविध शासकीय योजनेंतर्गत तीन लाखांहून अधिक क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. यातील ८0 टक्के तूर अद्यापही वखार महामंडळाच्या गोदामांतच पडून आहे. त्यामुळे ही तूर हलविल्याशिवाय गोदामांत सोयाबीन ठेवणे शक्य नाही. दरम्यान, शासकीय गोदामांत जागा नसल्याने साठवणुकीची अडचण दूर करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला असला तरी, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुढे सोयाबीन खरेदी निश्चितच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव आणि रिसोड येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची गोदामे असून, वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथे खासगी गोदामेही भाड्याने घेण्यात आली आहेत. त्यामध्ये वाशिम येथील शासकीय आणि खासगी गोदामांत मिळून १ लाख ७३ हजार ५00, मंगरुळपीर येथील गोदामांत ४0 हजार, मालेगाव येथील शासकीय आणि खासगी गोदामांत मिळून ६0 हजार आणि रिसोड येथील शासकीय आणि खासगी गोदामांत मिळून २५00 हजार क्विंटल मिळून एकूण २ लाख ७६ हजार क्विंटल तूर अद्यापही पडून आहे.
फेडरेशनचे अधिकारी घेणार आढावा!
राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची नाफेडद्वारे खरेदी सुरू करण्यात आली असली तरी, या खरेदीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाची पंचाईत झाली असून, शेतकरी वर्गात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात शासन स्तरावर माहिती सादर करण्यात आल्यानंतर शासकीय खरेदीचे नियोजन करण्याच्या सूचना मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयास देण्यात आल्या. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनचे मुंबई येथील व्यवस्थापक विविध जिल्ह्यात भेटी देऊन खरेदीचा आढावा घेत आहेत. वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते बुधवारी अकोला येथे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
मालेगाव येथील खरेदीवर तोडगा!
जिल्ह्यात कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम या सहाही तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले तरी, प्रत्यक्षात मालेगाव आणि मानोरा येथील खरेदी केंद्रावर ग्रेडर नसल्याने येथील खरेदी खोळंबली होती. त्यामधील मानोरा तालुक्याची समस्या सुटली, तर मालेगाव येथे ग्रेडर बुधवारी प्राप्त होणार असल्याने येथील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची समस्या सुटणार आहे. तथापि, या ठिकाणी असलेल्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत एक क्विंटल सोयाबीन साठविण्याची जागा नसल्याने येथे खरेदी करण्यात आलेले सोयाबीन इतर ठिकाणी उचलून न्यावे लागणार आहे. अशात सोयाबीनच्या वाहतुकीदरम्यान येणारी घट, ही शेतकर्यांच्या वजनातून काही प्रमाणात भरून काढण्यात येण्याचीही शक्यता आहे.
-