स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी ४८ संघटना एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:40 PM2018-01-16T23:40:38+5:302018-01-16T23:40:49+5:30
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी २८ जानेवारीला यवतमाळात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मागणीसाठी प्रथमच लिंगायत समाजाच्या ४८ संघटना एकत्र आल्या असून महामोर्चासाठी राज्यभरातील २ लाख समाजबांधव येणार असल्याची माहिती .....
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी २८ जानेवारीला यवतमाळात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मागणीसाठी प्रथमच लिंगायत समाजाच्या ४८ संघटना एकत्र आल्या असून महामोर्चासाठी राज्यभरातील २ लाख समाजबांधव येणार असल्याची माहिती मंगळवारी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे निमंत्रक अॅड. अविनाश भोसीकर, डॉ. अशोक मेनकुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१०२ वर्षीय राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज, कर्नाटक येथील भालकी मठाचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, कोरणेश्वर आप्पा महाराज आदी संतांच्या उपस्थितीत महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातूनही समाजबांधव सहभागी होणार आहेत. यापूर्वी नांदेड, लातूर, बेळगाव, बेदर, हुबळी, गुलबर्गा, चित्रदुर्ग, म्हैसूर, बंगरूळ, सांगली, विजापूर येथे मोर्चे काढण्यात आले.
आता २८ जानेवारीला यवतमाळच्या समता मैदानातून सकाळी १० वाजता महामोर्चा निघणार आहे. नगर पालिका माध्यमिक शाळा, पाचकंदिल चौक, वडगावरोड पोलिस ठाणे, नेताजी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मार्गाने मोर्चा जाणार असून १० महिलांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहे. मोर्चात येणाºयांसाठी अभ्यंकर शाळा, नंदूरकर विद्यालय, शिवाजी हायस्कूल, अमोलकचंद महाविद्यालय आदी ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. स्वतंत्र धर्माला मान्यता आणि समाजाला अल्पसंख्यकाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा निघणार असून समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेला अॅड. अविनाश भोसीकर, डॉ. अशोक मेनकुदळे, चंद्रशेखर उमरे, डॉ. जयेश हातगावकर, महेंद्र ठोंबरे, नीलेश शेटे, डॉ. किशोर मानगावकर, गिरीश गाढवे, सुरेश शेटे, संतोष नांदेकर, बाळासाहेब दिवे, सुधाकर केळकर, मंगेश शेटे, गजानन हमदापुरे आदी उपस्थित होते.
रविवारी दुचाकी रॅली
लिंगायत महामोर्चासाठी ग्रामीण भागात जाऊन समाजबांधवांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तर यवतमाळ शहरात महामोर्चाच्या वातावरण निर्मितीसाठी २१ जानेवारीला दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. येथील महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.