जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक
By रवींद्र चांदेकर | Published: January 4, 2024 09:36 PM2024-01-04T21:36:18+5:302024-01-04T21:37:14+5:30
कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली.
वणी (यवतमाळ): निळापूर-ब्राह्मणी रोडवरील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागून, अंदाजे दोन ते अडीच हजार क्विंटल कापूस व सरकी जळाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी काम करीत असलेल्या २५ मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. त्यावेळी २५ मजूर फॅक्टरीत काम करीत होते. सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले. फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम ५६ स्पिन मशीनवर सुरू होते. कापूस वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हजार क्विंटल कापूस, एक हजार क्विंटल सरकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी विमा कंपनी सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहे, अशी माहिती जीन मालकांनी दिली. घटनास्थळी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. आग विझवण्याचे काम नगरपरिषदेचा एक बंब करीत होता. राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग हे तालुक्यातील सर्वांत मोठे युनिट आहे. याठिकाणी दररोज दोन हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली होती.
कापसाची आवक वाढली; धोकाही वाढतोय
वणी येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस येतो. लगतच्या तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातीलही काही गावांमधील शेतकरी वणी येथे कापूस विक्रीला आणतात. यातून येथे जिनिंग व प्रेसिंगचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. शहराच्या बाहेर जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर जिनिंग-प्रेसिंग आहे. याच परिसरातून मोठ्या वाहनांद्वारे कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे अ