‘जेडीआयईटी’चा युरोपियन विद्यापीठाशी शैक्षणिक अनुबंध करार
By admin | Published: July 7, 2014 11:48 PM2014-07-07T23:48:22+5:302014-07-07T23:48:22+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली यशस्वी शैक्षणिक वाटचाल कायम ठेवीत यावर्षी युरोपियन विद्यापीठाशी शैक्षणिक अनुबंध करार करुन मानाचा तुरा खोवला आहे.
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली यशस्वी शैक्षणिक वाटचाल कायम ठेवीत यावर्षी युरोपियन विद्यापीठाशी शैक्षणिक अनुबंध करार करुन मानाचा तुरा खोवला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जेडीआयईटीच्या माध्यमातून अवगत व्हावी, या हेतूने यवतमाळसारख्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या या महाविद्यालयाने अनेक नामवंत, होतकरू विद्यार्थी घडविले आहेत. मागील वर्षी जेडीआयईटीच्या तज्ञ प्राध्यापकांच्या अभ्यास मंडळाचा दौरा पोलंड येथे घेण्यात आला. या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून यावर्षी अधिष्ठाता डॉ.अतुल बोराडे व रसायन अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. समीर देशमुख यांनी युरोपातील स्लोवाकिया देशाच्या स्लोवॉक युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नॉलॉजीला भेट दिली. शैक्षणिक अनुबंधातून संशोधनात्मक प्रोजेक्ट तसेच आपल्याकडील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी त्या विद्यापीठात संधी मिळावी, या हेतूने ही भेट घेण्यात आली. या बैठकीत स्लोवॉक युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नॉलॉजीचे व्हाईस रेक्टर डॉ.फ्रॉन्सिस हॉरनॉक यांचेशी चर्चा झाली. या चर्चेत जेडीआयईटीच्या विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षणाच्या दृष्टीने एम.एस. व पीएचडीची संधी तसेच स्नातक विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन महिन्याची प्रोजेक्ट ट्रेनिंग देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या बाबीचा फायदा महाविद्यालयाच्या विशेषत: मेकॅनिकल, सिव्हील, केमिकल, इलेक्ट्रीकल, कॉॅम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आदी शाखेच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे डॉ.बोराडे यांनी सांगितले.
स्लोवाकिया येथील विद्यापीठात एम.एस. सिरील अॅन्ड मेथॉडिएस विद्यापीठाचे रेक्टर डॉ.जोसेफ मॅथ्युज व डिन यांचेशी जेडीआयईटीचे प्राध्यापक व विद्यार्थी यांचा शैक्षणिक अनुबंध करार करण्यात आला. या करारांतर्गत युरोपातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ जेडीआयईटीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना होणार
आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यसभा सदस्य विजय दर्डा व संस्थेचे सचिव किशोर दर्डा तसेच प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनात अंकुरित या शैक्षणिक उपक्रमांतर्गत झालेल्या अनुबंध करारामुळे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरही ओळख निर्माण होण्यास मदत मिळणार असल्याचे डॉ.अतुल बोराडे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)