जातीचा बनावट दाखला देणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 09:47 PM2017-09-28T21:47:40+5:302017-09-28T21:47:56+5:30
तालुक्यातील काही नागरिकांकडे बनावट जातीचे दाखले आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यातील काही नागरिकांकडे बनावट जातीचे दाखले आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला आहे.
उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील सविता आनंदराव वानखेडे या युवतीने कुणबी जातीचा बनावट दाखला बनववून घेतला. सदर प्रकार निदर्शनास येताच उमरखेड महसूल विभागातर्फे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे उमरखेड तालुक्यात जातीचे बनावट दाखले तयार करून वितरीत करणारी टोळी सक्रीय असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सविता वानखेडे या युवतीचा कुणबी जातीचा दाखला बनावट असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्या दाखल्याच्या सत्यप्रतीची शहानिशा करण्यात आली असता, या दाखल्यावर अनुक्रमांक ५७३२ असल्याचे दिसून आले. या प्रकरणाची चौकशी केली असता विजय वसराम चव्हाण रा. धानमुख यांच्या बंजारा जातीचा हा दाखला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सविता वानखेडे हिचा जातीचा दाखला बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी सविता वानखेडे यांच्याविरुद्घ पोलिसात लेखी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यामुळे टोळी सक्रीय असल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
अशाप्रकारे बनावट जातीचे प्रमाणपत्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात वितरित केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना असा प्रकार आढळल्यास त्यांनी याबाबतची माहिती त्वरित महसूल प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.