कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांवर आले संकट
By admin | Published: February 7, 2016 12:44 AM2016-02-07T00:44:38+5:302016-02-07T00:44:38+5:30
शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये न आणता बाजारात कोठेही विकण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
‘सेस’ बुडणार : शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची मुभा
वणी : शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये न आणता बाजारात कोठेही विकण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे बाजार समित्यावर गंडांतर येणार असून बाजार समित्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीचे संकट कोसळणार आहे.
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीमार्फतच विकण्याची सक्ती शेतमाल पणन व विनियमन कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. या व्यवहारातून बाजार समितीला विक्री मूल्यांवर ‘सेस’ मिळतो. सेसच्या या उत्पन्नातून बाजार समितीचा आर्थिक डोलारा उभारला जातो. प्रत्येक बाजार समितीमध्ये सचिव, लेखापाल, लिपीक, शिपाई, पहारेदार, असे आठ-दहा कर्मचारी सेवेत आहे. त्यांचे वेतनही ‘सेस’च्या उत्पन्नातूनच केले जाते. तसेच बाजार समितीमार्फत शेतमालाची विक्री होत असल्याने अनेक अडते, मापारी, हमाल यांचा उदरनिर्वाह त्याच भरवशावर होत आहे.
अनेक बाजार समित्यांनी सेसच्या उत्पन्नातून आपला विकास करून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र शासनाने चार वर्षांपूर्वी काही ठिकाणी खासगी बाजार समित्या उघडण्यास परवानगी दिली. शेतकऱ्यांना स्पर्धात्मक संधी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे शेतकऱ्यांना विशेष लाभ न होता व्यापाऱ्यांनाच रान मोकळे झाल्याने व्यापाऱ्यांचीच चांदी होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हापासूनच शासकीय बाजार समित्यांना घरघर लागली आहे. व्यापाऱ्यांनी शासकीय बाजार समितीकडे पाठ फिरवून खासगी बाजार समितीशी सांगड जमवून खरेदीचे व्यवहार सुरू केले. परिणामी शासकीय बाजार समितीचे उत्पन्न एवढे खाली घसरले, की कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची वेळ शासकीय बाजार समित्यांवर आली आहे. आता शेतकऱ्यांना खुल्या बाजारात आपला माल विकण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे शासकीय व खासगी दोन्ही बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या स्वैराचारी खरेदीमुळे शेतकऱ्यांची लूबाडणूक होण्याची शक्यताही बळावली आहे. बाजार समितीमधील कर्मचारी, अडते, मापारी यांचे संसार उघड्यावर पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने आता बाजार समित्यांना वेतन अनुदान सुरू करावे व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यामधून द्यावे किंवा कर्मचाऱ्यांना इतर विभागात सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बाजार समित्यांनी उत्पन्नाचे स्रोत शोधणे गरजेचे
प्रत्येक शासकीय बाजार समितीकडे स्थावर मालमत्ता आहे. यामधील काही मालमत्ता विकून त्यामधून उत्पन्नाचे दुसरे स्रोत शोधण्याची वेळ बाजार समित्यांवर येणार आहे. बाजार समित्यांनी गोदामे, मंगल कार्यालये, व्यावसायीक गाळे, स्वत:ची शेतमाल खरेदी, यासारखे उत्पन्नाचे स्रोत तयार करून आपले अस्तित्व टिकविण्याची गरज आहे. सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाने यावर चिंतन करणे अपरिहार्य झाले आहे. अन्यथा बाजार समित्याच नष्ट होण्याची भीती आहे.