अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 03:14 PM2018-10-28T15:14:54+5:302018-10-28T15:53:32+5:30
ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
यवतमाळ - ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष ठरविण्यासाठी यवतमाळ येथे साहित्य महामंडळाची बैठक सुरू होती. यामध्ये एकमताने डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 11, 12, 13 जानेवारीला यवतमाळमधील पोस्टल मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ढेरे यांच्या नावाची घोषणा केली. निवडणुकीशिवाय संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे पहिल्याच अध्यक्ष आहेत.
महामंडाळाच्या विविध घटक संस्थांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी आलेल्या नावांतून एकाची निवड करण्यासाठी यवतमाळमध्ये रविवारी बैठक पार पडली. या बैठकीला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विजया राजाध्यक्ष, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके, रमाकांत कोलते, डॉ. विद्या देवधर, प्रा. कौतिकराव ठाले पाटील, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुधाकर भाले, प्रा. मिलिंद जोशी, कपूर वासनिक, प्रकाश पायगुडे, चंद्रशेखर जोशी, डॉ. आसाराम लोमटे, दिलीप खोपकर, विनोद कुळकर्णी, एकनाथ आव्हाड आदी महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला गेला नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.
साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चार साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदोर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०१८ सालच्या यवतमाळ येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ महिलेच्या गळयात पडणार का, याबाबत चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना.धों.महानोर ही नावे पाठवण्यात आली होती.