चार दिवसांपासून ‘अवनी’चे बछडे उपाशी, सात वनपथकांद्वारे दोन दिवसांपासून शोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:56 AM2018-11-06T06:56:12+5:302018-11-06T06:57:23+5:30
अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली असून युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे.
- नरेश मानकर
पांढरकवडा (यवतमाळ) : अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली असून युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. लोणीच्या जंगलातील बेस कॅम्पमधून ही मोहिम राबविली जात आहे.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या एका पथकाला वरूड डॅमजवळ दोन बछडे आढळून आले. परंतु दाट झुडूपात लपून असलेले हे बछडे लगेच दुसरीकडे निघून गेले. नंतर ते न दिसल्याने पथकाला माघारी परतावे लागले. सोमवारी दिवसभरातदेखील त्यांचा ठावठिकाणी मिळाला नाही.
आई गेल्यामुळे बछडे सैरभैर झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे दोन्हीही बछडे उपाशी असल्याची शक्यता आहे. आणखी दोन-चार दिवसांत त्यांना काही खायला मिळाले नाही, तर भुकेपोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. ११ महिन्यांचे बछडे हे केवळ बकरीचे लहान पिल्लू किंवा इतर दुसऱ्या लहान प्राण्याचीच शिकार करू शकतात, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांच्या आदेशानुसार, अवनीच्या दोन बछड्यांना पकडण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू आहे. बछड्यांना बेशुद्ध करून पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल, अशी माहिती येथील वनविभागातर्फे देण्यात आली.
सुप्रीम कोर्टाचे आदेश धाब्यावर
अवनीला ठार मारल्यावर बछड्यांचे काय करायचे, याबाबत वनाधिकाºयांनी गांभीर्याने घेतले नसल्याची टीका वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आधी बछड्यांना जेरबंद करा आणि नंतर वाघिणीला पकडा, असे स्पष्ट केले होते.