बी.एड. विद्यार्थ्यांचा उठाव
By admin | Published: February 7, 2017 01:22 AM2017-02-07T01:22:30+5:302017-02-07T01:22:30+5:30
बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी प्राचार्यांविरोधात उठाव केला.
प्राचार्यांविरुद्ध दुजाभावाचा आरोप : महाविद्यालयाबाहेर बसून नोंदविला निषेध
यवतमाळ : बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी प्राचार्यांविरोधात उठाव केला. महाविद्यालयाबाहेर बसून विद्यार्थ्यांना निषेध नोंदविला. यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
वर्गात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जाणिवपूर्वक गैरहजर दाखविले जाते. काही विद्यार्थ्यांना यातून सुट दिली जाते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. गैरहजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी पत्र पाठविण्याची धमकी दिली जाते, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपित्यांचे चित्र रेखाटण्यावर आक्षेप घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
गैरहजेरी लावण्यासोबतच प्रॅक्टीकलचे गुण कापण्याची धमकी दिली जाते. या संदर्भातील तक्रार पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सोमवारी आंदोलनात स्वप्नील आंबटकर, सुनील आडे, प्रशांत राठोड, सचिन जाधव, प्रांजली ठाकरे, शितल शर्मा, हुमायू सय्यद यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या संदर्भात प्राचार्य डॉ.एस.एस. लिंगायत म्हणाल्या, आपण दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला. कामकाजात सुधारणा करण्यास सुरुवात केली. यातून अनेक गैरप्रकार पुढे आले. आणखी गोंधळ उघड होण्याची भीती गैरप्रकार करणाऱ्यांना वाटत आहे. यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना ढाल बनविले. माझे कामकाज विद्यार्थ्यांना आवडत नसेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार आहे. यासोबतच पुराव्यानिशी गैरप्रकार चव्हाट्यावर आणनार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांनी संबंधितांना निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे. (शहर वार्ताहर)