पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:22 PM2018-02-04T22:22:52+5:302018-02-04T22:24:18+5:30

तालुक्यातील १७ गावांमधील २३ प्रभागांमध्ये २३ सदस्यांची पदे विविध कारणाने रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

 Byelection requires a validity certificate | पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक

पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक

Next
ठळक मुद्दे आजपासून नामनिर्देशन सुरू : १७ गावांच्या २३ सदस्यांसाठी निवडणूक

ऑनलाईन लोकमत
वणी : तालुक्यातील १७ गावांमधील २३ प्रभागांमध्ये २३ सदस्यांची पदे विविध कारणाने रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र भरण्याला सुरूवात होणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरले जाणार आहे. यावेळी नामनिर्देशनपत्र आॅनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहे. मात्र आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तालुक्यातील घोन्सा, कुंभारखणी, नवरगाव, निलजई, शेवाळा, कुर्ली, साखरा (को.), ढाकोरी बोरी, कळमना (खु.), लालगुडा, वरझडी, वारगाव व अहेरी येथील प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होणार आहे, तर चिंचोली, परसोडा व चनाखा येथील प्रत्येकी दोन जागासाठी आणि राजूर (कॉलरी) येथे चार जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र देण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर मुदतवाढ देण्यात न आल्याने या निवडणुकांसाठी आरक्षित पदांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
निवडणूक विभागाने मारेगाव (कोरंबी) येथील पाच पदासाठीही निवडणूक जाहीर केली होती. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर २ डिसेंबरला ग्रामविकास मंत्रालयाने येथील सरपंच व चार सदस्यांचे अपिल मंजुर करून त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे निवडणूक विभागाने मारेगाव कोरंबी येथील पाच पदासाठी होणारी निवडणूक रद्द केली आहे.
ग्रामविकास मंत्रालयाने अपिल मंजुर करताना सरपंच व सदस्यांना ताकीद देऊन ग्रामपंचायत अधिनियमाचे यापुढे उल्लंघन करण्यात येऊ नये, असे बजावण्यास अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार रवींद्र जोगी हे काम पाहत आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी जी.एन.देठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२३ पैकी २० जागा महिलांसाठी
ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणूक जाहीर झालेल्या १७ गावातील २३ जागांपैकी घोन्सा व अहेरी येथील दोन जागा वगळता सर्व जागा आरक्षित गटातल्या आहेत. त्यातही २३ पैकी २० जागा विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. यातील बऱ्याचशा जागा मागील निवडणुकीत त्या संवर्गासाठी उमेदवारी अर्ज न भरल्या गेल्यानेच रिक्त राहिल्या होत्या, तर घोन्सा, राजूर व वारगाव येथील ग्रामपंचायत उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्याने त्या जागा रिक्त झाल्या आहेत. आता नामनिर्देशनासोबत पुन्हा जात वैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याने यापैकी किती जागांसाठी अर्ज येतील, हे मुदतीअंतीच कळणार आहे.

Web Title:  Byelection requires a validity certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.