मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 09:48 PM2017-12-27T21:48:17+5:302017-12-27T21:48:30+5:30
नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च करण्यात आला. यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून नवीन क्षेत्रात विकास कामांवर कवडीचाही खर्च न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता मूल्यांकनासाठी वारेमाप खर्च करण्यात आला. यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून नवीन क्षेत्रात विकास कामांवर कवडीचाही खर्च न केल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे.
नगरपरिषद हद्दीत लगतच्या सात ग्रामपंचायत क्षेत्रातील एक लाख ३६ हजार लोकसंख्या विलीन झाली. या क्षेत्रातील ३६ हजार मालमत्तांचाही यात समावेश आहे. या सर्व मालमत्तांचे आधीच मूल्यांकन झाले होते. तरीही पालिकेने या पुन्हा मूल्यांकन केले. त्यापोटी संबंधित खासगी कंपनीला प्रत्येकी ४७० रूपये देण्यात आले. मात्र मूल्यांकन करताना संबंधित कंपनीने ३६ हजारांऐवजी तब्बल ६३ हजार मालमत्तांचे मूल्यांकन केल्याचा अहवाल दिला.
मालमत्तांचे मूल्यांकन करणाºया कंपनीने दुप्पट मालमत्ता दर्शविल्याने पालिकेवर साडे तीन कोटींचा भुर्दंड पडला. यापैकी दोन कोटींचे देयक अदा करण्यात आले. तसेच छायाचित्र अपलोड करण्यासाठी साडेचार लाख, संगणकीकृत माहिती सादर करण्यासाठी साडेचार लाख रूपये द्यावे लागणार आहे. सोबतच प्रशिक्षणावर ४५ हजारांचा खर्च करण्यात आला. बिल वाटपासाठी ८० रूपयांचे देयके आकारले गेले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी निविदाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पालिकेच्या कारभाराविषयी बुधवारी नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. त्यातून त्यांनी निविदा रद्द न झाल्यास येत्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक दिनेश चिंडाले, बबलू देशमुख, विजय खडसे, सपना लंगोटे, वैशाली सवाई, सुषमा राऊत आदी नगरसेवक उपस्थित होते.