शास्त्रीय संगीत ही आजीची गोधडी, तिला जपा; महेश काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 09:36 AM2017-11-25T09:36:04+5:302017-11-25T09:40:09+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त महेश काळे शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ‘दर्डा उद्यान’ येथे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शास्त्रीय संगीतासह ‘कट्यार’बाबतचे अनुभवविश्व मनमोकळेपणे मांडले.
अविनाश साबापुरे ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाशी माझी खूप पूर्वीच नाळ जुळलेली आहे. कारण या मूळ नाटकाचे संगीत माझ्या गुरुजींचे (पं. जितेंद्र अभिषेकी) आहे. एका अर्थाने कट्यार माझ्या रक्तातच होती. नंतर चित्रपट झाला, मी गायलो अन् राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. गुरुजींचे संस्कार मला इथवर घेऊन आलेत. चित्रपट यशस्वी झाला, त्याची मेख मूळ नाटकात आहे... शास्त्रीय संगीताच्या बळावर नव्या युगातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे महेश काळे ‘लोकमत’शी बोलत होते.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त महेश काळे शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ‘दर्डा उद्यान’ येथे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शास्त्रीय संगीतासह ‘कट्यार’बाबतचे अनुभवविश्व मनमोकळेपणे मांडले. ते म्हणाले, कट्यार काळजात घुसली या नाटकात मी अभिनय केला. २००९ मध्ये या नाटकाचे पुनरूज्जीवन झाले, तेव्हाच या कथेत ७० एमएमची स्टोरी दिसू लागली. पण एवढ्या गाजलेल्या नाटकाचा सिनेमा करणे म्हणजे एका ताजमहालापुढे दुसरा ताजमहाल बांधण्यासारखे होते. तरीही आमच्या टिमने तो साकारला. मी बहुतांश वेळ अमेरिकेत असतो. ‘कट्यार’चे ट्रॅक मला अमेरिकेत पाठविले जायचे, माझ्या स्वरात तिथे गाणे रेकॉर्ड व्हायचे. ‘कट्यार’ने मला राष्ट्रीय पुरस्कार दिला. तो महत्त्वाचा मानतोच. पण गुरुजींनी (पं. जितेंद्र अभिषेकी) मला त्यांचे शिष्यत्व दिले, तोच सर्वात मोठा पुरस्कार मी मानतो.
शास्त्रीय संगीताच्या प्रसाराचे प्रयत्न
शास्त्रीय संगीत म्हणजे अवजड कला, असा भ्रम बहुतांश तरुणांमध्ये असतो. पण आज महेश काळे यांचे शास्त्रीय गायन ऐकण्यासाठी तरुणाईच्याच उड्या पडत आहेत. त्या विषयी महेश काळे म्हणाले, हवा बदलली की पिढीही बदलते. भारतीय शास्त्रीय संगीताची मुलांमध्ये, तरुणांमध्ये आवड निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. आपण आज झाड का लावतो? पुढच्या पिढ्यांना सावली मिळावी म्हणूनच ना! शास्त्रीय संगीत आपण आज नाही जपले, तर पुढच्या पिढ्यांना कसे कळणार? आपले अभिजात संगीत ही आपल्या आजीची गोधडी आहे. आजीची गोधडी आपण आयुष्यभर विसरत नाही. शास्त्रीय संगीताची गोधडी जपण्याचीही आपलीच जबाबदारी आहे. म्हणूनच मी अमेरिकेतही मुलांना शास्त्रीय संगीत शिकवित असतो.
मुलांवर संगीताचे संस्कार करा
आज आपल्या शालेय शिक्षणात शास्त्रीय संगीताला शून्य स्थान आहे. खूप वर्षापूर्वी टीव्हीवर रात्री शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम लागायचा, तेव्ही आईवडील मुलांना म्हणायचे, लवकर झोपा. मग शास्त्रीय संगीत मुले ऐकणार कधी? पूर्वी आॅल इंडिया रेडिओवर ऐकायला मिळायचे. आता तर सकाळी उठल्यापासूनच रेडिओ मिरची सुरू होते. म्हणूनच संस्कार महत्त्वाचे आहेत. आपला मुलगा काय ऐकतोय याची काळजी घेतली पाहिजे. शाळेत शास्त्रीय संगीत शिकवा म्हणून पालकांनी तर आता मोर्चा काढण्याची वेळ आली आहे, असेही महेश काळे म्हणाले.
विदर्भातही चोखंदळ रसिक
विदर्भातल्या रसिकांविषयी मत व्यक्त करताना ते म्हणाले, देश-विदेशात कार्यक्रम करताना मी सर्वच प्रकारचे रसिक पाहिले. चांगले आणि वाईट हे दोन्ही प्रकार सर्वत्रच असतात. चोखंदळ रसिक सगळीकडेच आहेत. उलट मोठ्या शहरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये कलेविषयी अप्रूप जास्त असते. कारण तिथे फार कार्यक्रम होत नसतात. सप्लाय अँड डिमांडवर सर्व अवलंबून असते. चांगल्या गाण्यासाठी गायकाला आरोग्य जपावेच लागते. स्वास्थ्य नीट असेल तर मन शांत असते. तरच गाणंही चांगलं होते. मला दह्याचा त्रास होतो, हे गेल्या काही दिवसातील प्रयोगानंतर कळले. म्हणून आता मी सूर्यास्तानंतर दही खात नाही.
दर्डा उद्यान प्रत्येक कलाकाराचं ड्रिमलॅण्ड
यवतमाळ दौऱ्याविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, येथे सुंदर उद्यान आहे. येथे पाऊल ठेवताच तुषार लक्ष वेधून घेतात. थंडगार सावली, लता वेली, फुलांच्या संगतीत, हिरव्यागार तृणांच्या मखमलीवर गायन करायला कुणाला आवडणार नाही? बघा ना, येथे किती निवांत वातावरण आहे. किती निरव शांतता आहे. खरे तर हे ठिकाण (दर्डा उद्यान) प्रत्येक कलाकाराचं ड्रिमलॅण्ड आहे!