वणीत सायबर सेलचा मटका अड्ड्यावर छापा; २१ जण अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 06:17 PM2022-05-06T18:17:57+5:302022-05-06T18:26:43+5:30
या कारवाईत २१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या, तर १३ लाख ६२ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वणी (यवतमाळ) : येथील नांदेपेरा मार्गावरील नवकार नगरमधील एका निवासस्थानात थाटण्यात आलेल्या मटका अड्ड्यावर यवतमाळच्या सायबर सेलने गुरुवारी रात्री वेशांतर करून धाड टाकली. या कारवाईत २१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या, तर १३ लाख ६२ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
वणीतील नवकारनगर परिसरात मिनाज ग्यासोद्दीन शेख याच्या अर्धवट बांधकाम असलेल्या घरात मटका अड्डा सुरू करण्यात आला होता. याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यांनी सायबर सेलच्या पथकाला वणीत कारवाईसाठी पाठवले. गुरुवारी रात्री पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेशांतर करून या मटका अड्ड्यावर धाड टाकली.
या कारवाईत विशाल महिपतराव पिसे, फरदीन अतिक अहेमद, अनिकेत शिवा काकडे, मोहन पांडुरंग काकडे, ज्ञानदेव अनिल बावणे, संजय शामराव ढुमणे, राजेश विजय शिवरात्रीवार, शेख साजीद शेख सावीर, शेख युनूस शेख मुनाफ, अनिल मधुकर लोणारे, मजीबुल अबीबूर रहेमान शेख, रउफ हबीबूर रहेमान शेख, प्रणाल माधव पारखी, गजानन वामन चित्तलवार, दीपक गोविंदा पचारे, महेश गंगाधर टिपले, दिलावर अकबर शेख, अतिक फहीम अहेमद, सुरज भारत सातपुते, सईद साबीर सईद सलाउद्दीन, गौरव संतोष नागपुरे या २१ जणांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी मिनाज ग्यासोद्दीन शेख हा घटनास्थळी न सापडल्याने त्याच्याविरुद्ध भादंवि १०९ अन्वये कारवाई करण्यात आली.
६१ हजारांची रोकड जप्त
सायबर सेलने मटका अड्ड्यावरून ६१ हजार ५९० रुपयांची रोख रक्कम, तीन लॅपटॉप, चार प्रिंटर, १७ दुचाकी, ५३ मोबाईल हँडसेट असा १३ लाख ६२ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.