पांढरकवडा येथील मोदींच्या सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:01 PM2019-02-21T12:01:55+5:302019-02-21T12:51:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

Death of the student due to absence of water in Modi's meeting at Pandrakkadavar | पांढरकवडा येथील मोदींच्या सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

पांढरकवडा येथील मोदींच्या सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचा बळीपाच तास पाण्याविना

नरेश मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातव्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. क्षितीजा बाबूराव गुटेवार (१२) रा. शिवाजी वार्ड पांढरकवडा असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
क्षितीजा ही पांढरकवडा येथील जिल्हा परिषद विद्यालयाची (माजी शासकीय विद्यालय) सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. पांढरकवडा येथे शनिवार १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी ८ वाजताच आॅटोरिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता आणि सात वर्षाचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यातच सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्हही जोरात होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. घसा कोरडा पडत असताना दूरदूरपर्यंत पाणी दिसेनासे झाले. त्यातच गर्दी असल्याने तेथे अडकलेल्या महिलांना बाहेर निघणेही कठीण होते. कुणी निघण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलिसांकडून आडकाठी आणली जात होती.

‘जागीच बसून रहा’ : पोलिसांचे फर्मान
सुरक्षेच्या कारणावरून ‘जागीच बसून रहा’ असे फर्मान पोलीस अधिकाऱ्यांकडून सोडले जात होते. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना रहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी क्षितीजाची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवाजी वार्डात शोककळा
क्षितीजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील आहे. तिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर क्षितीजाची आई ही मुलांसह माहेरी पांढरकवडा येथे रहायला आली. क्षितीजाच्या आईला आजोबांनी घर बांधून दिले व घरीच छोटेसे किराणा दुकान लावून दिले. क्षितीजाचा मामा विनोद पेंटावार पांढरकवडा येथे पानटपरी चालवितो. क्षितिजाच्या निधनाने शिवाजी वार्डात शोककळा पसरली आहे.

महिलांमध्ये संतप्त भावना
मोदींच्या सभेत पिण्याच्या पाण्याची आयोजकांनी व्यवस्था न केल्याने क्षितीजाचा मृत्यू झाल्याची संतापजनक भावना शिवाजी वार्ड परिसरातील महिलांनी व्यक्त केली. विशेष असे क्षितीजाची प्रकृती बिघडणे ते बुधवारी निधन झाल्यापर्यंत भाजपाचा कुणीही पदाधिकारी तिच्या घराकडे फिरकला नाही.

क्षितीजाला नरेंद्र मोदींच्या महिला मेळाव्यात वेळीच पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिची प्रकृती खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र यात आता नेमका दोष कुणाला द्यावा हेच समजत नाही.
- विनोद पेंटावार (पांढरकवडा)
क्षितीजाचा मामा.

Web Title: Death of the student due to absence of water in Modi's meeting at Pandrakkadavar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.