बीटीच्या शेकडो पाकिटांची बोदड नाल्यात विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:19 PM2018-01-24T23:19:32+5:302018-01-24T23:19:42+5:30

बोगस बिटी बियाण्यांविरुद्ध सर्वत्र प्रचंड ओरड होत असतानाच बीटी-२ बियाण्यांच्या शेकडो पाकिटांची यवतमाळनजीकच्या बोदड येथील नाल्यात परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

 The disposal of hundreds of Bt's bottled Nalay disposal | बीटीच्या शेकडो पाकिटांची बोदड नाल्यात विल्हेवाट

बीटीच्या शेकडो पाकिटांची बोदड नाल्यात विल्हेवाट

Next
ठळक मुद्देकपाशी बियाणे : २०१६ चा साठा काढला २०१८ मध्ये बाहेर

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बोगस बिटी बियाण्यांविरुद्ध सर्वत्र प्रचंड ओरड होत असतानाच बीटी-२ बियाण्यांच्या शेकडो पाकिटांची यवतमाळनजीकच्या बोदड येथील नाल्यात परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याच एक्सपायरी झालेल्या पाकिटातील बीटी बियाण्यांची २०१७ च्या खरीप हंगामात विक्री झाली असावी असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीने प्रचंड आक्रमण केले. त्यात कपाशीची शेती उद्ध्वस्त झाली. अळ्यांचे आक्रमण होणार नाही, असा दावा करीत जादा दराने बिटी बियाण्यांची विक्री केली गेली. परंतु अळ्यांच्या आक्रमणाने या बियाण्यांमधील ‘बिटी’चा दावा फोल ठरला. जणू अळ्यांनीच या बिटी बियाण्यांचे खरे स्वरूप उघड केले. अळ्यांचे आक्रमण रोखण्यासाठी प्रचंड कीटकनाशक फवारणी केली गेली. त्या नादात जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याने जीव गमवावा लागला.
बोंडअळीच्या आक्रमणामुळे कपाशीच्या बिटी बियाण्यांभोवती संशयाचे वलय निर्माण झाले. कंपन्यानी बोगस बिटी बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याची ओरड झाली. ही ओरड काहीशी कमी होताच बियाण्यांचा तो बोगस साठा गोदामातून बाहेर काढला जात आहे. त्याची दुर्गम ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावली जात आहे. असाच एक गंभीर प्रकार यवतमाळ-चौसाळा रोडवरील बोदड येथे बुधवारी उघडकीस आला. बोदड येथील नाल्यात बिटी बियाण्यांची शेकडो पाकिटे आढळून आली. या बियाण्यांवर एक्सपायरी डेट २०१६ असे नमूद आहे. यावरून २०१६ मध्ये एक्सपायरी झालेले हे बिटी बियाणे २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले असण्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. अशा बोगस बिटी बियाण्यांमुळेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे.
नाल्यात फेकण्यात आलेले बिटीचे हे वाण अनेक शेतकऱ्यांच्या परिचयाचे नाही. या बियाण्याची उगवण शक्ती कमी होती. या बियाण्यावर बिटी-२ असा उल्लेख आहे. हे बियाणे विकण्याची संबंधित कंपनीला परवानगी होती का, होती तर ती कुणी दिली, अशी किती पाकिटे विकली गेली, या सर्व बाबी सध्या गुलदस्त्यातच आहे. या बियाण्यांमुळे शेतकरी दशोधडीला लागले. बोगस बियाण्यांवर धाडसत्र सुरू असताना कृषी सेवा केंद्र चालक आणि काही एजंटांनी असे बोगस बियाणे आणि औषधी दडवून ठेवल्या.
विशेष म्हणजे त्यांचे बियाणे परत घेण्यास त्यांच्या मुख्य एजंटांनीही नकार दिला. यामुळे या बियाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता ती नाल्यात फेकली जात असल्याचे दिसून येते.
कृषी खात्याच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह
काही कृषी सेवा केंद्रांमध्ये नामांकित बियाणे आणि औषधाच्या तुलनेत परवाना नसलेल्याच वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीस होत्या. कीटकनाशक मृत्यू प्रकरणानंतर असे बियाणे आणि औषधी कृषी केंद्रातून अचानक गायब झाल्या. परिणामी अनेक कृषी केंद्रे सध्या रिकामी आहे. अनेकांनी रात्रीतून बियाणे आणि कीटकनाशकांची विल्हेवाट लावली. आता दडवून ठेवलेले उर्वरित बियाणे अशा पद्धतीने फेकले जात आहे.

Web Title:  The disposal of hundreds of Bt's bottled Nalay disposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.