हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या संचालक मंडळाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:19 AM2018-06-25T11:19:29+5:302018-06-25T11:21:47+5:30
दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.मुंबईच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी पंचवार्षिक (२०१८ ते २०२३) निवडणूक होत आहे. या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.मुंबईच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी पंचवार्षिक (२०१८ ते २०२३) निवडणूक होत आहे. या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी व सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वार्षिक दीडशे कोटींची उलाढाल आणि एक हजार ७१० मतदार असलेल्या हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनसाठी १ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात मतदान होणार आहे. उपनिबंधकांचे कार्यालय हे मतदान केंद्र असणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी याचे मतदार आहेत. ही संस्था सोसायट्यांना तर सोसायट्या सभासदांना गृहनिर्माणासाठी वित्त पुरवठा करते. या कार्पोरेशनचे २१ पैकी सात संचालक बिनविरोध झाल्याने उर्वरित १४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान घेतले जाईल.
‘प्रगती’चे नेतृत्व पुणे-औरंगाबादकडे
काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्तपणे प्रगती पॅनल रिंगणात उतरविले आहे. पुण्याचे राष्ट्रवादीचे माजी महापौर अंकुश काकडे, जळगावचे आमदार डॉ. सतीश पाटील आणि औरंगाबादचे काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड या पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. तर भाजपा समर्थित सहकार पॅनल रिंगणात असून मुंबईचे आमदार प्रवीण दरेकर व नाशिकचे माजी आमदार वसंत गिते त्याचे नेतृत्व करीत आहे.
हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद अनुक्रमे रवींद्र गायगोले (अमरावती) व योगेश पारवेकर (यवतमाळ) यांच्या रुपाने भाजपाच्या हाती आणि त्यातही विदर्भाकडे आहे. हे दोन्हीजण यावेळी पुन्हा रिंगणात आहेत.
सात संचालक अविरोध
कार्पोरेशनच्या या निवडणुकीत सात संचालक बिनविरोध निवडून आले आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रगती पॅनलचे आमदार डॉ. सतीश पाटील (जळगाव), विजय पाटील (जळगाव), व्ही.बी. पाटील (कोल्हापूूर), सागर काकडे (पुणे) व ललित चव्हाण (सातारा) तर भाजपा समर्थित सहकार पॅनलचे आमदार बाळासाहेब सानप (नाशिक) व माजी आमदार वसंत गिते (नाशिक) यांचा समावेश आहे.
सर्वाधिक संचालक मराठवाड्यात
कार्पोरेशनचे सर्वाधिक चार संचालक मराठवाड्यात आहेत. पुणे तीन, नाशिक तीन, मुंबई, कोकण, अमरावती व नागपूर विभागाला प्रत्येकी दोन संचालक आहेत. अविरोध सात पैकी पाच संचालक प्रगती पॅनलचे असल्याने सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीची घौडदौड पहायला मिळत आहे.
अमरावती विभागात २०३ मतदार
अमरावती महसूल विभागात २०३ मतदार असून सर्वाधिक १२५ एकट्या अमरावती जिल्ह्यातील आहेत. गायगोले, पारवेकरांशिवाय प्रगती पॅनलचे वसंत घुईखेडकर (यवतमाळ), कार्पोरेशनचे माजी अध्यक्ष अजय पाटील टवलारकर व दीपक कोरपे (दोन्ही अमरावती) आदी उमेदवार आहेत.
पाच संचालक अविरोध झाल्याने प्रगती पॅनलची ताकद वाढली असून उर्वरित जागांच्या प्रत्यक्ष निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या पॅनलची विजयी घौडदौड कायम राहील.
- वसंत घुईखेडकर (यवतमाळ)
उमेदवार, प्रगती पॅनल.
सत्ताधारी भाजपाने सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून त्याचा फायदा या निवडणुकीत भाजपा समर्थित सहकार पॅनलला निश्चित होईल. पुन्हा भाजपाची सत्ता कार्पोरेशनवर येईल.
- रवींद्र गायगोले (अमरावती)
विद्यमान अध्यक्ष तथा उमेदवार सहकार पॅनल.