शेतकऱ्यांनो बोगस खतापासून सावधान; सेंद्रीयच्या नावाने बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:13 PM2019-05-29T12:13:41+5:302019-05-29T12:14:01+5:30
मिश्रखत आणि सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत शेतकऱ्यांवर थोपविले जात आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहे. यामुळे स्वस्त खत खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हीच संधी हेरत बोगस कारखानदारांनी पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. असे खत थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहचत आहे. काही जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर कृषी आयुक्तालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मिश्रखत आणि सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत शेतकऱ्यांवर थोपविले जात आहे.
शेतीकरिता डीएपी, १०:२६:२६, २०:२०:०:१३, म्युरिट आॅफ पोटॅश, सिंगल सुपर फॉस्पेट यासारखी खते बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होतात. या खतांच्या किमती १४७५ रूपयांपर्यंत पोहोचल्या आहे. त्या तुलनेत मिश्रखतांच्या किमती कमी आहेत. यामुळे शेतकरी मिश्रखत वापरण्याकडे वळत आहेत.
शेतकऱ्यांची निकड लक्षात घेत मिश्रखतामध्ये कंपन्यांनी त्यामध्ये असणारे एनपीके हे घटक कमी अधिक प्रमाणात टाकण्यास सुरूवात केली आहे. पोत्यावर दर्शविलेले हे घटक खतात आहे किंवा नाही हे सांगणे अवघड आहे. असे काही बोगस खत बाजारात आले आहे. मराठवाड्यात अशा खतांचे कारखाने सिल झाले आहेत. त्यांचा हा माल सर्वत्र वळविला जाण्याचा धोका आहे. यामुळे भरारी पथकांनी अशा खतांचा शोध सुरू केला आहे. बाजारात उपलब्ध असलेले खत नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तर काही मिश्रखतांना विक्री बंदीचे आदेश दिले आहेत. नमुन्याच्या तपासणीनंतर मिश्रखतातील ‘कन्टेन्ट’ कळणार आहेत. सेंद्रीय खताच्या नावावर बोगस खत बजारात येत आहे. त्यामध्ये कुठले घटक आहेत, त्याची उपयोगीता, यावर कृषी विभागाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. असे खत शेतकऱ्यांनी वापरले तर पैसे व्यर्थ जाण्याचा धोका आहे.
१८:१८:१० ऐवजी ९:९:५
मिश्रखताच्या निर्मितीत पुरेसे ‘कन्टेन्ट’ वापरले जात नाही. यामुळे काही राज्यात मिश्रखताच्या वापरावरच बंदी आहे. महाराष्ट्रात अशी बंदी नाही. मात्र त्यामध्ये निर्देशित घटक नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १८:१८:१० हे घटक ९:९:५ या प्रमाणात काही कंपन्यांच्या उत्पादनात आढळले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वेळेपूर्वीच असे खत शोधण्याचे आव्हान कृषी विभागापुढे आहे.