यवतमाळात आढळला फ्लेमिंगोचा थवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 02:40 PM2019-04-01T14:40:41+5:302019-04-01T14:41:16+5:30
यवतमाळरांना या पक्षाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर शहराजवळील बेंबळा धरणावर सोमवारी सकाळी फ्लेमिंगोचा थवा आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशभरातील पक्षी अभ्यासकांनी ज्याची प्रचंड उत्सुकता आहे, ते फ्लेमिंगो पक्षी चक्क यवतमाळात आढळले. शहरी मुलांची हौस फिटावी म्हणून मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्चून फ्लेमिंगोची खास सोय केली. मात्र यवतमाळसारख्या दूरस्थ ठिकाणी हे फ्लेमिंगो स्वमर्जीने आलेत. बेंबळा धरणावर आढळलेल्या फ्लेमिंगोच्या थव्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत महत्त्वाची भर पडली आहे.
यवतमाळरांना या पक्षाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर शहराजवळील बेंबळा धरणावर सोमवारी सकाळी फ्लेमिंगोचा थवा आढळला. येथील अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी आणि डॉ. दीपक दाभेरे हे पक्षीनिरीक्षक धरणावर दैनंदिन पक्षीनिरीक्षण करण्यासाठी गेले असता त्यांना गुलाबी पांढऱ्या रंगाच्या ११ फ्लेमिंगो पक्ष्यांचा देखणा थवा आढळला.
यवतमाळ जिल्ह्यात फ्लेमिंगो आढळण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी पांढरकवडा शहराजवळील सायखेडा धरणावर त्याची प्रथम नोंद झाली होती. आता बेंबळा धरण हे पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. सध्या या धरणावर परतीच्या प्रवासावर असलेल्या विदेशी पक्ष्यांची मोठी संख्या आढळत आहे. यामध्ये मोरशराठी, खोनचिखल्या, राखी चिखल्या, कंठेरी पाणभिंगरी, राखी पाणटिवळा, शेरटा, पालासचा कुरव, विविध सुरय अशा अनेक स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी बेंबळा धरणावर पाहायला मिळत आहे.
असा आहे फ्लेमिंगो
या पक्ष्याचे नाव मोठा रोहीत आहे. त्याला इंग्रजीमध्ये ग्रेटर फ्लेमिंगो म्हणतात. तर फोनिटोपटेरेस रोसेयस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. या पक्ष्याची मान १४० सेंटीमीटर लांबीची आहे. चोच आणि पायही लांबलचक आहेत. काळी कडा असलेले गुलाबी पंख ही ग्रेटर फ्लेमिंगोची खास ओळख आहे.
खाऱ्या पाण्याचे तलाव आणि खाजणाच्या जागा, सागरी किनारे या भागात फ्लेमिंगो सहसा आढळतात. पण हा पक्षी जर बेंबळा या गोड्या पाण्याच्या जलाशयावर आढळत असेल तर हा विचार करण्याचा मुद्दा आहे. पाण्यात झालेले बदल यासाठी कारणीभूत आहेत. शिवाय फ्लेमिंगोचे अन्न बेंबळावर मोठ्या प्रमाणात असल्याचे हे सूचक आहे. पक्षी अभ्यासकांनी या धरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रा.डॉ. प्रवीण जोशी
पक्षी अभ्यासक, यवतमाळ