कृष्णापूरच्या जंगलात वन अधिकारी तळ ठोकून

By admin | Published: September 17, 2015 03:08 AM2015-09-17T03:08:40+5:302015-09-17T03:08:40+5:30

तालुक्यातील कृष्णापूर जंगलातील अवैध वृक्षतोड ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर वनविभागात एकच खळबळ उडाली असून वनअधिकारी जंगलात तळ ठोकून आहेत.

Forest officials encroach on the forest of Krishnapur | कृष्णापूरच्या जंगलात वन अधिकारी तळ ठोकून

कृष्णापूरच्या जंगलात वन अधिकारी तळ ठोकून

Next

प्रकरण दडपण्याचे प्रयत्न : आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल
उमरखेड : तालुक्यातील कृष्णापूर जंगलातील अवैध वृक्षतोड ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर वनविभागात एकच खळबळ उडाली असून वनअधिकारी जंगलात तळ ठोकून आहेत. प्रकरण दडपण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, आणखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णापूर जंगलात २५० पेक्षा अधिक सागवान वृक्षांची अवैध कत्तल केल्याची बाब उघडकीस आली. याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठांना होताच त्यांनी गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली. गत पाच दिवसांपासून उमरखेड वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या कृष्णापूर, पिरंजी, पार्डी या भागातील जंगलात कुठे आणि किती सागवानाची कत्तल झाली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. वनविभागाचे पुसद येथील डीएफओ कमलाकर धामगे यांनी स्वत: स्थळ पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात सागवान कत्तल झाल्याचे पुढे आले.
उमरखेडचे सहायक वनरक्षक सुभाष दुमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोदाजी चव्हाण हे सर्व प्रकरणात अडकण्याची शक्यता दिसू लागली. गेल्या चार दिवसांपासून जंगलातील वृक्षतोड दडपण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. मजूर लाऊन प्रकरण रफादफा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. जंगलातील माल जमा करून तो जप्तीत दाखविण्याचे व कारवाई केल्याचे दाखविले जात आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत डीएफओ धामगे, सहायक वनरक्षक सुभाष दुमारे, भरारी पथकाचे सहायक वनरक्षक के.पी. धुमाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोदाजी चव्हाण, वनपाल हक, वनरक्षक अरविंद राठोड यांच्यासह वनमजूर तळ ठोकून आहेत. अधिकाऱ्यांना या प्रकरणातून अलगद बाजूला सारण्यासाठी जुने सागवान जप्तीत दाखविले जाण्याची भीती आहे. जंगलात तोडलेले सागवान आणि जप्तीतील सागवान जुळत नसल्याने त्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. या वृक्षतोडीची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात सखाराम कोकणे रा.चिंचोली, संतोष डकळे, राजू साखरे रा.निंगनूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या सहा झाली आहे. वरिष्ठ अधिकारी याची चौकशी करीत असून मोठे घबाड बाहेर येणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Forest officials encroach on the forest of Krishnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.