संजय देशमुख यांच्या 'एन्ट्री'मुळे यवतमाळात सेनेला बळकटी; मातोश्री येथे बांधले शिवबंधन
By विशाल सोनटक्के | Published: October 20, 2022 06:07 PM2022-10-20T18:07:28+5:302022-10-20T18:16:38+5:30
दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोड यांच्यासमोर आव्हान
यवतमाळ : माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी गुरुवारी दुपारी मुंबई येथे ‘मातोश्री’मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समर्थकांसह शिवबंधन बांधले. देशमुख यांच्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात सेनेला नव्याने बळकटी मिळाली आहे. यानिमित्ताने अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्यासमोरही तगडे आव्हान उभे करण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचा जोर आहे. सेनेतील बंडाळीनंतर संजय राठोड यांनी शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला. त्यामुळे राठोड यांच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून तोडीसतोड उमेदवाराचा शोध सुरू होता. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी मागील महिन्यात अकोला येथे देशमुख यांच्यासोबत सेना प्रवेशासंबंधी प्राथमिक चर्चा केली होती तेव्हापासूनच संजय देशमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असा अंदाज जिल्ह्यात वर्तविला जात होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देशमुख यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुनश्च बोलणी होऊन त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी मातोश्री येथे देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधन बांधून घेतले.
संजय देशमुख यांनी १९९९ ते २००९ असे दहा वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मतदारसंघातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. दरम्यान, देशमुख यांच्या पक्षप्रवेशाचे वृत्त समजल्यानंतर नेरसह विविध ठिकाणी फटाके फोडून त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
या सहकाऱ्यांनीही बांधले शिवबंधन
मातोश्री येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय देशमुख यांनी शिवसेनेची मशाल हातात घेतली. यावेळी दिग्रसचे माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगरसेवक रुस्तम पप्पूवाले, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष ॲड. रवींद्र गावंडे, बाजार समिती सभापती साहेबराव पाटील, उपसभापती सुदाम राठोड, दिग्रस विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष दीपक वानखडे, दारव्हा पंचायत समिती सदस्य संतोष ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.
सर्वसामान्यांसाठी काम करणार
माझा मूळ पिंड शिवसैनिक असाच आहे. विरोधकांनी सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. अशावेळी सेनेला नव्याने बळकटी मिळाली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. माझ्या वयोवृद्ध आईनेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आज कुठलीही अपेक्षा न ठेवता ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधले. यापुढील काळातही जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.
- संजय देशमुख, माजी मंत्री