विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावणारे शिक्षण द्या - शिक्षणमंत्री विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 04:45 PM2018-01-20T16:45:22+5:302018-01-20T16:45:57+5:30
शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असते. शहरासोबतच ग्रामीण आणि मागास भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, हे शासनाचे धोरण आहे.
यवतमाळ – शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असते. शहरासोबतच ग्रामीण आणि मागास भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, हे शासनाचे धोरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे, त्याचा विकास करून शिक्षण दिले तर तो रोजगाराभिमुख होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विदर्भातील संस्थाचालक व प्राचार्यांसोबत संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विजय दर्डा होते. मंचावर संस्थेचे सचिव किशोर दर्डा, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर उपस्थित होते.
कौशल्य विकासासाठी नवीन प्रकारच्या अभ्यासक्रमाला प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे, असे सांगून शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, याबाबतचे अभ्यासक्रम केवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) न चालविता ते अभियांत्रिकी महाविद्यालयातसुध्दा चालविणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात एकदम बदल करून चालत नाही. तर तो टप्प्याटप्प्याने करावा लागतो. सद्यस्थितीत समाजकल्याण विभागाची सन 2016-17 पर्यंतची 60 टक्के शिष्यवृत्ती शासनाकडून देण्यात आली आहे. पुढील वर्षापासून डीबीटीच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होईल. ही शिष्यवृत्ती तशीच संबंधित महाविद्यालयांमध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात येईल.
अभियांत्रिकी महाविद्यालयात रिक्त असणा-या जागांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यावर बंधन आणता येणार नाही. कुठे प्रवेश घ्यावा, हा त्याचा अधिकार आहे. सद्यस्थितीत जे महाविद्यालये सुरू आहेत, ते एआयसीटीच्या नियमानुसारच सुरू असल्याने आणखी नवीन महाविद्यालये आणि जागा वाढविण्याची गरज नाही. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधित महाविद्यालयात शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात येईल. शाहू महाराज शिष्यवृत्ती वाढविण्यात आली आहे.
शिक्षणसंस्था चालकांच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे लक्ष दिले जाईल. शासनावरचा भार कमी करण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी खाजगी संस्थांना परवानगी दिली. शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. संस्थाचालकांना कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत कशी मदत करता येईल, याबाबत नक्कीच विचार करू. शिक्षण संस्था चालकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी एक समिती तयार करून शासन स्तरावर त्याबाबत चर्चा करण्यात येईल. चांगले शिक्षण देण्यावर सरकारचा भर आहे, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोल्हटकर यांनी शिक्षण संस्थाचालकांच्या समस्यांची माहिती दिली. यावेळी विजय दर्डा यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी केले. संचालन व आभार मोहित पोपट यांनी मानले. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश संभे, शिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव यांच्यासह विदर्भातील जवळपास 50 महाविद्यालयांचे प्राचार्य व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.