इसमाची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 10:07 PM2018-01-05T22:07:26+5:302018-01-05T22:08:23+5:30
बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या एकाने संशयिताची दगडाने ठेचून हत्या केली. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मंगेश बोरीकर या युवकाला खुनाच्या आरोपात अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या एकाने संशयिताची दगडाने ठेचून हत्या केली. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मंगेश बोरीकर या युवकाला खुनाच्या आरोपात अटक केली आहे.
वणी शहरालगतच्या रजानगर (लालगुडा) भागात राहणाऱ्या एका महिलेशी अशोक येलनवार (३५) याचे प्रेमसंबंध असल्याची शंका तिचा भाऊ मंगेश बोरीकर याला होती. यातून अनेकदा त्याचे बहिणीशी खटकेही उडालेत. सदर महिला आपल्या पतीपासून विभक्त राहते. संबधित महिला व अशोक येलनवार यांची बोलचाल नित्याचीच होती. त्यातून मंगेशला नेहमीच शंका येत होती. या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची त्याची भावना झाली. एमआयडीसीमध्ये मेकॅनिकल म्हणून काम करणारा मंगेश बोरीकर गुरूवारी रात्री कामावरून घरी आला. यावेळी त्याची बहिण घरात नव्हती. त्यामुळे तिला शोधण्यासाठी मंगेश पुन्हा घराबाहेर पडला.
दरम्यान, त्याच परिसरात एका घराच्या आडोशाला अशोक व मंगेशची बहीण गप्पा करीत असताना मंगेशच्या नजरेस पडले. त्यामुळे बेभान होऊन मंगेशने अशोकवर हल्ला करून त्याला खाली पाडले. त्यानंतर बाजूला असलेला दगडच अशोकच्या डोक्यात घातला. यामुळे गंभीर जखमी झालेला अशोक जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मंगेशला ताब्यात घेतले. याप्रकरणी मृत अशोकच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. मृत अशोक हा नळ फिटींगचे कामे करीत होता. त्याचे लग्नही झाले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.
मंगेश अनेकदा दिली होती अशोकला तंबी
आरोपी मंगेशने मृत अशोक येलनवार याला माझ्या बहिणीशी बोलायचे नाही, अशी अनेकदा तंबी दिली होती. त्यावरून या दोघांमध्ये वादही झाला होता. गुरूवारी रात्री या वादाचे पर्यावसन अशोकच्या हत्येत झाले. शुक्रवारी आरोपीला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने आरोपी मंगेशला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.