थायलँडमधील कोंबड्याच्या झुंजीने रोवले विदर्भात पाय; करोडोंची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 12:54 PM2022-06-24T12:54:23+5:302022-06-24T13:02:43+5:30

दिवाळी संपल्यानंतर रंगतो अवैध खेळ, वणी, झरीजामणी, मारेगाव तालुक्यात मोठे अड्डे.

illegal sport of cock fighting in wani of yavatmal district with a turnover of billions | थायलँडमधील कोंबड्याच्या झुंजीने रोवले विदर्भात पाय; करोडोंची उलाढाल

थायलँडमधील कोंबड्याच्या झुंजीने रोवले विदर्भात पाय; करोडोंची उलाढाल

googlenewsNext

वणी (यवतमाळ) : सद्यस्थितीत पोलिसांच्या धाकाने बंद असलेला कोंबड बाजार हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे. मुळात थायलँडमध्ये खेळला जाणाऱ्या या खेळाने जुगाराचे रूप धारण करत विदर्भात कधी पाय रोवले, हे कुणालाही कळले नाही. महिन्याकाठी करोडोची उलाढाल करणारी ही कोंबड्यांची पैज अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी ठरली आहे.

दिवाळीचा सण आटोपला की, कोंबड बाजाराला उधाण येते. वणी, झरी, मारेगाव, पांढरकवडा या तालुक्यांमध्ये कोंबड बाजार भरविणाऱ्या अवैध व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. यातून हे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या गबर बनले आहेत.

असा खेळला जातो जुगार

पोलिसांची धाड पडू नये म्हणून जंगल भागात कोंबड बाजार भरविला जातो. कोंबड बाजार भरविणारे एक किंवा त्यापेक्षा अधिक लोक असतात. कमिशन बेसवर या कोंबड बाजारात कोंबड्यांची झुंज लावली जाते. कोंबड बाजारात पैज लावणारे शौकीन स्वत:चे कोंबडे या ठिकाणी आणतात. त्यानंतर दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावली जाते. तत्पूर्वी किती रूपयांची शर्यत लावायची, हे ठरविले जाते. दोघांमध्ये जी रक्कम ठरेल, त्यापैकी दोघांकडूनही १० किंवा १५ टक्के रक्कम ही कमिशन म्हणून कोंबड बाजार भरविणाऱ्या म्होरक्याला द्यावी लागते. त्यानंतर स्पर्धा सुरू होते. कोंबड्यांच्या पायांना धारदार कात्या बांधून या कोंबड्यांना एकमेकांशी भिडविले जाते. या पैजेत प्रसंगी एका कोंबड्याचा मृत्यू होतो. जो जिंकला तो कोंबड्यांचा मालक. हारणाऱ्यांकडून ठरलेली रक्कम व मृत झालेला कोंबडा घेऊन शर्यतीतून बाहेर पडतो.

वणी, झरी, मारेगावात अनेक अड्डे

वणी, झरी, मारेगाव या तीन तालुक्यांमध्ये कोंबड बाजार भरविण्याचे अनेक अड्डे जंगलात आहेत. वणी तालुक्यात केसुर्लीचे जंगल, भालर वसाहतीच्या पलीकडील जंगल, निवली, तरोडा, पुनवट, बोर्डा, रासातील फुलोरा जंगल, वरझडीचे जंगल, झरी तालुक्यातील पिंपरी, नेरड पुरड, तेजापूर, शिबला, दरा साखरा, निमणी, आंबेझरी तसेच मारेगाव तालुक्यातील सुसरी पेंढरी, गोधणी, म्हैसदोडका या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबड बाजार भरविले जातात.

पैजेतील कोंबड्यांना तगडी खुराक

कोंबड बाजारातील शर्यतीतील कोंबडे हे बेरड तसेच मद्रासी जातीचे असतात. या कोंबड्यांना खुराकही तगडी दिली जाते. मांसाचे तुकडे, ड्रायफ्रूट्स यासह कडधान्य आदी खाद्य या कोंबड्यांना चारून त्यांना सशक्त बनविले जाते. कोंबड बाजाराचे शौकीन या कोंबड्यांची अतिशय चांगली खातीरदारी करतात.

आंध्र, तेलंगणातील शौकीनांची हजेरी

खरिप हंगाम संपल्यानंतर साधारणत: नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोंबड बाजार भरविल्या जातो. कोंबड बाजारात ओढ (शर्यत) लावण्यासाठी केवळ स्थानिकच नाही, तर आंध्रप्रेदश तसेच चंदपूर, नागपूर व लगतच्या जिल्ह्यातील अनेक शौकीन या भागातील कोंबड बाजारात हजेरी लावतात. एकावेळी पाच हजार ते ५० हजार रूपयांपर्यंत शर्यत लावली जाते.

कातकऱ्यांनाही मिळतो रोजगार

लढतीसाठी आणलेल्या कोंबड्यांच्या पायांना काती बांधल्या जातात. ह्या काती स्टील अथवा तांब्यापासून बनविलेल्या असतात. ते बांधणारे कातकरी कोंबड बाजारात आवर्जून हजर असतात. कोंबड्यांच्या पायांना काती बांधण्याच्या कामासाठी या कातकऱ्यांना चांगला माेबदला दिला जातो.

अवैध दारू विक्रीलाही येते उधाण

ज्या जंगल भागात कोंबड बाजार भरविला जातो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू देखील विकली जाते. मात्र जोपर्यंत कोंबड बाजार भरविणारा दारू विक्रेत्याला यासाठी परवानगी देत नाही, तोपर्यंत दारू विक्रेत्याला दारू विकता येत नाही. यासाठी दारू विक्रेत्याला कोंबड बाजाराच्या म्होरक्याला कमिशन द्यावे लागते. यासोबतच त्याठिकाणी लावण्यात येणाऱ्या संलग्न व्यवसायाचे देखील कमिशन कोंबड बाजाराच्या म्होरक्याला द्यावे लागते.

Web Title: illegal sport of cock fighting in wani of yavatmal district with a turnover of billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.