अवैध प्रवासी वाहतुकीचा कहर
By admin | Published: July 14, 2017 01:50 AM2017-07-14T01:50:00+5:302017-07-14T01:50:00+5:30
शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तरी केला जातो.
पोलिसांचे दुर्लक्ष : पुसद तालुक्यात धोकादायक प्रवास, टपावरून वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तरी केला जातो. मात्र ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच दिसत नाही. परिणामी तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध प्रवाशी वाहतुकीन कहर केला आहे. धोकादायक प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे योग्या नियोजन दिसत नाही. त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. प्रवाशांच्या सोयीनुसार बसची सेवा दिसत नाही. अनेक मार्गावरील बससेवा कमी उत्पन्न देतात म्हणून बंद करण्यात आली. तर अनेक मार्गावारी तासन्तास प्रतीक्षा करून ही बस येत नाही. तर काही मार्गावर लागोपाठ बसेस धावतात. असे प्रकार ग्रामीण भागात पहावयास मिळतात. या गैरसोयींनी वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात.
ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बसस्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला आहे. या वाहतुकदारांचे दलाल बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. हे वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत. शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करतात. या गोष्टीमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून रिक्षा, टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे.
बसचालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्रधान्य दिले जाते. या उलट खासगी प्रवासी वाहतुकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या अवैध वाहतुकीला लगाम घालावा, अशी मागणी आहे.
पोलिसांचे साटेलोटे
वाहतूक पोलीस आणि अवैध प्रवासी वाहतूकदारांचे संबंध मधूर आहेत. त्यामुळे आॅटोरिक्षा किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. काही वेळा तर थेट मागे लटकून किंवा वर टपावर बसवून वाहतूक केली जाते. पुसद परिसरात दिसते अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे सोंग केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.