पोफळणीत ज्ञानरचनावादाचे रोल मॉडेल
By admin | Published: April 24, 2017 12:08 AM2017-04-24T00:08:01+5:302017-04-24T00:08:01+5:30
दुर्गम भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले आहे.
दोन हजार शिक्षकांच्या भेटी : कल्पकतेने टाकाऊ वस्तूपासून साकारले साहित्य
यवतमाळ : दुर्गम भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत कळंब तालुक्याच्या पोफळणी कोलाम पोडावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी कल्पकतेने संपूर्ण शाळाचा ज्ञानरचनावादाची ‘रोल मॉडेल’ बनविली आहे. या दोन शिक्षकी शाळेला राज्यभरातील तब्बल दोन हजारांवर शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. प्रत्येकाचा रिमार्क हा ‘एक्सलन्ट’ असाच आहे.
पोफळणी शाळेची पटसंख्या ३५ इतकी आहे. कोलाम पोड असल्याने विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त दुसरीकडे कुठेच शैक्षणिक वातावरण मिळत नाही. त्यामुळे परपंरागत शैक्षणिक पध्दतीत विद्यार्थ्यांचे मन लागत नव्हते. शिक्षकांनाही मुलांमध्ये रूची निर्माण करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मुख्याध्यापक वसंत शेळके आणि सहायक शिक्षण राजेश उरकुडे यांनी ज्ञानरचनावाद पध्दतीतबाबत ऐकले. ही पध्दत काय चा अभ्यास केला. मात्र त्यांच्यापुढे साहित्य खरेदीची समस्या निर्माण झाली. या शिक्षकांनी साहित्य खरेदीच्या खर्चाचा भार उचलून मिळेल त्या टाकावू वस्तूपासून शैक्षणिक साहित्य सारकारले. त्याचा परिणाम म्हणून ही शाळा आता बिना फळ््याची व खडूची झाली आहे. येथे छडीचीही गरज पडत नाही. मुलांचा संपूर्ण वेळ खेळत खेळत अध्ययनात जातो.
या शाळेतील पहिल्या, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी कितीही मोठा भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी काही क्षणात करून दाखवितात. ज्ञानरचनावादाच्या साहित्यामुळे भाषा, गणित, भूमितीय पध्दती अगदी सोप्या प्रकारे मुलांनी आत्मसात केल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक या शाळेला भेटी देण्यासाठी येतात. आतापर्यंत तब्बल दोन हजारांवर शिक्षकांनी शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी दिलेला अभिप्राय अतिशय बोलका आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील उर्दू शाळेचे सहायक शिक्षक शहजाद अहमद, चांदूर रेल्वे येथील शाळा सीध्दी निर्धारक विवेक राऊत, मेटीखेड्याचे केंद्र प्रमुख सिध्दार्थ बन्सोड यांनी या शाळेला भेट देऊन दोन्ही शिक्षकांच्या कार्याची भरभरून प्रशंशा केली आहे. ही शाळा रोल मॉडेल असली तरी, शिक्षण विभाग अथवा प्रशासनाकडून शिक्षकांच्या पाठीवर साधी कौतुकाची थाप मिळाली नाही. यावरून शिक्षण विभाग किती सजग आहे हे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)