‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याने थायलंडमध्ये पटकाविले सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:06 PM2017-10-30T22:06:43+5:302017-10-30T22:07:01+5:30
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत इंगोले याने सुवर्ण पदक प्राप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत इंगोले याने सुवर्ण पदक प्राप्त केले. तो सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.
‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅफ केमिकल अँड एन्विरॉन्मेंटल इंजिनिअरिंग’ या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेत अनिकेतने इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलर हा शोधनिबंध सादर केला. या प्रोजेक्टसाठी प्रा. रिना पानतावने, विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांचे मार्गदर्शन लाभले.
परिषदेत तायवान, जर्मनी, थायलंड, इंडोनेशिया, चीन, सिंगापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जगाच्या विविध भागातून सादर झालेल्या शोधनिबंधाची पूर्ण तपासणी व पडताळणी करूनच परिषदेसाठी निवड केली जाते. नवीन संशोधनाची दिशा व त्यातील तंत्रज्ञानाची जागतिक देवाणघेवाण हा यामागील मुख्य उद्देश आहे. जेडीआयईटीच्यावतीने अनिकेत इंगोले याने प्रतिनिधित्व करत गोल्ड मेडल पटकाविले. त्याच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले.