आमदार राजू तोडसाम यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:33 PM2019-02-13T12:33:23+5:302019-02-13T12:56:58+5:30
भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्यामुळे पक्षाची बेअब्रू झाली असून अशा आमदाराची तातडीने भाजपातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांना व त्यांच्या दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीने भररस्त्यात मारहाण केली. त्यामुळे पक्षाची बेअब्रू झाली असून अशा आमदाराची तातडीने भाजपातून हकालपट्टी करावी, त्यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांनी केली आहे.
भाजपाने तोडसाम यांची तत्काळ हकालपट्टी न केल्यास १६ फेब्रुवारी रोजी पांढरकवडा दौºयावर येऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात आपण तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी व आईसह प्रकरण नेऊ, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे. किशोर तिवारी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये नमूद केले की, मंगळवारी रात्री पांढरकवडा येथील वाय-पॉईंटवर आमदार राजू तोडसाम यांची शिक्षिका असलेली पहिली पत्नी, आई व नातेवाईकांनी तोडसाम तसेच त्यांच्या दुसºया पत्नीला भररस्त्यात जबर मारहाण केली. या वादात ठोस तोडगा काढला जावा, अशी आपली मागणी आहे.
आमदार राजू तोडसाम यांची यापूर्वी कंत्राटदाराला पैसे मागितल्याची ऑडिओ फीत जाहीर झाली होती. पांढरकवडा येथे नवे ठाणेदार रुजू झाले. त्यांंनी तमाम अवैध धंदे बंद केले. मात्र मटका, जुगार व इतर अवैध धंदे सुरू करावे, यासाठी तोडसाम यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी ते नव्या कार्यतत्पर ठाणेदाराच्या बदलीची मागणी करीत आहे. तोडसाम हे खंडणीकार माणूस आहे. आमदार तोडसाम यांनी पहिल्या पत्नीशी दगाबाजी केली. त्यामुळे पत्नी व आईने दुसऱ्या पत्नीला जबर मारहाण केली. त्यामुळे तोडसाम यांच्यावर द्विभार्या प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, त्यांना अटक करण्यात यावी, भाजपाने तोडसाम यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. ही कारवाई न झाल्यास संपूर्ण प्रकरण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात नेले जाईल, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.
Video : विदर्भातील भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकसभा मतदारसंघातील व भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांच्या विधानसभा मतदारसंघातील पांढरकवडा येथे बचतगटाच्या महिलांना संबोधित करण्यासाठी येत आहेत. भाजपाकडून मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू असताना व तीन लाख महिलांना मेळाव्यासाठी उपस्थित ठेवण्याची धडपड सुरू असताना भाजपा आमदाराचे दुसऱ्या पत्नीला पहिलीकडून झालेल्या मारहाणीचे हे प्रकरण चव्हाटयावर आल्याने भाजपा नेतृत्वाची चांगलीच कोंडी झाली आहे. मोदींचा दौरा लक्षात घेऊनच पोलीस ठाण्यात प्रकरण रेकॉर्डवर न घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले गेले. अखेर त्यात त्यांना यशही आले.