आता आले आहे ‘एसटी’चे चिल्लरमुक्त स्मार्ट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:35 PM2017-12-08T14:35:40+5:302017-12-08T14:43:26+5:30
‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ योजना सादर करून ‘एसटी’ने वाहक आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या वाद-विवादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विलास गावंडे ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : सकाळी ६ वाजता सुटणाऱ्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशाने २६ रुपयांच्या तिकीटासाठी ५०० रुपयांची नोट टिकविली अन् वाहकाचे माथे ठणकले. तोंडातोंडी सुरू होऊन प्रवाशाने जबाबदारीचे भान ठेवण्याची जाणीव वाहकाला करून दिली. अखेर शिल्लक राहिलेली रक्कम तिकीटाच्या मागे लिहून देण्यावर समझोता होऊन पुढील प्रवास सुरू, असा लोकवाहिनीचा अनुभव. मात्र येणाऱ्या मे महिन्यापासून ‘एसटी’तला हा गोंधळ थांबणार आहे. ‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ योजना सादर करून ‘एसटी’ने वाहक आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या वाद-विवादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पहिली फेरी घेऊन जाणाऱ्या वाहकाच्या हाती सुटे देण्यासाठी ‘एसटी’ १०० रुपये टिकविते. दहाच्या दहा नोटा असतात. सध्या ५०० रुपयांच्या नोटेची चलती आहे. बहुतांश प्रवासी २५-३० रुपयांच्या तिकीटासाठी एवढी मोठी नोट हाती ठेवतो, तेव्हा वाहकाच्या डोक्यावर आट्या पडते. अन् तेथूनच सुरू होते हमरी-तुमरी आणि अनावश्यक वाद-विवाद. दीर्घ कालावधीनंतर का होईना यावर उपाय शोधण्यात आला आहे. ‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ या नावाने सुरू केलेल्या योजनेतून प्रवाशांसह वाहकांचीही सोय केली जात आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या योजनेची घोषणा केली.
सुरुवातीला ५० रुपयांचे स्मार्ट कार्ड घ्यायचे. पहिल्यांदा वापर करण्यासाठी ५०० रुपये भरायचे. ही रक्कम संपल्यानंतर किमान १०० रुपयांचा भरणा करून पुढील प्रवासासाठी मोकळे. १ मे महाराष्ट्र दिनापासून याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. प्रत्येक आगारातून स्मार्ट कार्ड मिळणार आहे. विशेष म्हणजे ‘अहस्तांतरनिय’ची सक्ती नाही. कुणीही काढा आणि कुणीही वापरा, ही सुविधा मिळणार आहे. जितका प्रवास केला तितकी रक्कम कार्डमधून वजा होत राहील. कुटुंबातील सदस्य, मित्र आणि इतर कुणीही काढलेले कार्ड वापरून प्रवासाची सोय या कार्डाद्वारे होणार आहे.
लाल डबा ते शिवशाहीतही वापरा
लालडबा, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध या कुठल्याही बसमध्ये हे कार्ड चालणार आहे. घरबसल्यादेखील आॅनलाईन रक्कम या कार्डवर भरणा केली जाऊ शकते. या कार्डमुळे प्रवास सुखकर होईल, अशी महामंडळाला आशा आहे.