तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:05 PM2018-02-09T13:05:47+5:302018-02-09T13:06:17+5:30
दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी! गडबडून जाऊ नका, या प्रश्नोत्तराचा परीक्षेशी संबंध नाही, संबंध आहे तो केवळ परीक्षेचे टेन्शन कमी करण्याचा. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी चक्क पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताण तणावातून मुक्त करण्यासाठी १६ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या शंकांची उत्तरे देणार आहेत. दिल्लीत हा संवाद कार्यक्रम होणार असून देशभरात त्याचे टीव्ही, रेडिओ, यूट्यूब चॅनल, फेसबुक आदींद्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत ‘माय गव्हर्मेंट’ या संकेतस्थळावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून प्रश्न नमूद करावा लागणार आहे. या प्रश्नांचा समावेश मोदींच्या कार्यक्रमात होणार असून १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या एक तासात त्याची उत्तरे पंतप्रधान देणार आहेत.
हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत दाखविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी १६ फेब्रुवारीला शाळेत टीव्ही, प्रोजेक्टर असे आवश्यक साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दहावीच्या तोंडी परीक्षा आहेत.
परंतु, पंतप्रधानांच्या ‘संवाद’ कार्यक्रमासाठी १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ हा एक तास तोंडी परीक्षेच्या नियोजनातून वगळावा, असेही निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.
‘नमों’च्या पुस्तकावर विचारा प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक नुकतेच ३ फेब्रुवारीला प्रकाशित झाले आहे. परीक्षांमधील मानसिक ताण-तणावाचा विषय त्यात पंतप्रधानांनी हाताळला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात या पुस्तकाविषयी विशेष करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे, अशी अपेक्षाही शिक्षण खात्याने व्यक्त केली आहे.