पोलीस चौकीतूनच मोबाईल लंपास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:46 AM2017-07-20T00:46:13+5:302017-07-20T00:46:13+5:30
जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेकरिता पोलीस चौकी थाटून कर्मचारी तैनात करण्यात आले.
यवतमाळ बसस्थानक : लक्तरे वेशीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेकरिता पोलीस चौकी थाटून कर्मचारी तैनात करण्यात आले. परंतु चोरट्यांनी चक्क पोलीस अधिकाऱ्यांनाच हिसका दाखविल्याचा प्रकार सोमवारी रात्री ७.३० वाजता घडला. चोरट्याने पोलीस चौकीत तैनात सहायक पोलीस निरीक्षकाचा मोबाईल लंपास करून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत.
पोलीस मुख्यालयात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप रामा मसराम हे सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक पोलीस चौकीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजची तपासणी करीत होते. तपासणी करताना त्यांनी आपला मोबाईल लगतच्या खिडकीत ठेवला होता. ते कामात मग्न असल्याची संधी साधून चोरट्याने हात साफ केला. चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली.
पोलिसांनी लगेच बसस्थानक परिसरात चोरट्याची शोधाशोध केली. मात्र चोरटा गवसलाच नाही. अखेर एपीआय मसराम यांनी वडगाव रोड ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बसस्थानकावर गुन्हे घडू नये, बॅग लिफ्टर, पाकीटमार हेरता यावे यासाठी पोलीस तैनात असतात. मात्र पोलीसच चोरट्यांचे शिकार झाल्याने प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी कुणाकडे पहावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.