जल हे जीवन समजून शिरोलीने केले जल व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 09:02 PM2018-02-26T21:02:19+5:302018-02-26T21:02:19+5:30

जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती.

Shiroli Water Management | जल हे जीवन समजून शिरोलीने केले जल व्यवस्थापन

जल हे जीवन समजून शिरोलीने केले जल व्यवस्थापन

googlenewsNext
ठळक मुद्देज्योती कांबळे : सूक्ष्म नियोजनातून सोडली पाणी समस्या

विठ्ठल कांबळे ।
आॅनलाईन लोकमत
घाटंजी : जल हे जीवन मानून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजून सांगितले. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. यात प्रामुख्याने आर्थिक बाब महत्त्वाची होती. परंतु यावरही तोडगा काढून ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वीरित्या शिरोलीमध्ये पाणी व्यवस्थापन केले. सरपंच ज्योती गौतम कांबळे यांच्या या कार्याची दखल घेत लोकमतने त्यांना सरपंच अवॉर्ड देवून सन्मानित केले.
अतिशय गरीब परिस्थितीतून बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या ज्योती कांबळे यांना आरक्षणामुळे गावचा कारभार पाहण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्याची आवड असल्याने सरपंच म्हणून मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी पुरेपूर वापर केला. लोकचर्चा, लोकसहभाग वेळपडल्यास ग्रामसभा घेवून अनेक समस्या मार्गी लावल्या. घाटंजी तालुक्यातील तीन हजार १६९ लोकसंख्या असलेल्या शिरोली गावात अनेक दिवसांपासून पाणी समस्या होती. पाच किमी अंतरावरून गावात नळयोजनेने पाणी आणले जात होते. हा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय कमी होता. जलसंधारण करण्यासाठी ग्रामपंचायतीने माहितीकोष तयार केला. गावातून पूर्व-पश्चिम वाहणारा नाला आहे. या नाल्यावर कृषी विभागाच्या माध्यमातून चार बंधारे साकारण्यात आले. यात एक बंधारा व तीन कोल्हापुरी बंधारे आहेत. पाणीपुरवठ्याची विहीर असलेल्या अडाण नदीवरही बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. त्यानंतर गावातील पाण्याच्या इतर स्त्रोतांचीही पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या पाच व खासगी सहा विहिरी आहेत. दहा हातपंप व एक बोअरवेल आहे. नळयोजना ही १९८१ सालची असून तिची कालमर्यादा अधिक आहे. या पाणीपुरवठा विहिरीला पाणीपातळी कमी राहात असल्याने सतत गावात टंचाई जाणवत होती. बंधाऱ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून तसेच काही भागातील लोकसहभागातून गाळाचा उपसा केल्यानंतर पाणी पातळीत कमालीची वाढ झाली.
नाल्यावर सिमेंट बंधारा टाकून पाणी अडविण्यात आले. यासाठी १६ लाख २१ हजार रुपयांचा निधी खर्च केला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील ५०० मीटरपर्यंतच्या विहिरींची पाणी पातळी वाढली. परिणामी जवळच्या २५ हेक्टर शेतीत सिंचन करणे शक्य झाले. पाणीपुरवठा करून शासकीय योजनेतून चार बोअरवेल तयार केले. यालाही भरपूर पाणी आहे. जलव्यवस्थापनासोबतच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ब्लिचिंग पावडर, टीसीएल पावडर नियमित वापरण्यात येते. याकरिता जलसंरक्षकाची नेमणूक केली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनासाठी ही भरपूर काम केले आहे. गावात २३६ पथदिवे असून सौरऊर्जेवर आहेत. चार एलईडी लाईट लावण्यात आले. येथे प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. या शाळांना डिजीटल करून संगणक व प्रोजेक्टचा वापर अध्यापनासाठी केला जातो. हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधकाम केले आहे. शौचालय वापरासाठी जनजागृती सुरू आहे. प्रत्येक वॉर्डातील नाल्यांचे काम झाले असून आरोग्याच्या दृष्टीने शोषखड्डे तयार केले आहे. गावातच आरोग्य उपकेंद्र व गुरांचा दवाखानाही आहे. या माध्यमातून नियमित लसीकरण मोहीम राबविली जाते. तंटामुक्त समिती सक्रिय असून दारू बंदीकरिताही प्रयत्न केले जात आहे. महिलांकरिता मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. गावात कुºहाडबंदी व चाराबंदीच्या अभियान सुरू असून ४४३ झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. गावातील प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून १९ प्रकारचे दाखले देण्याची सुविधा आहे. मोबाईल व डिश टीव्ही रिचार्ज, रेल्वे आरक्षण, पॅनकार्ड, शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरणे, राजीव गांधी जीवनदायीचे कार्ड वाटप, धडक सिंचन योजनेचे अर्ज, आधारकार्ड, बँकेला लिंक करणे, वीज बिल भरणे, रोजगार हमीचे सर्व कामकाज, पांदण रस्ता, सिंचन विहिरी, कृषी विषयक योजनांची माहिती, शेतात सौरपंपांचा वापरसाठी प्रयोग, औषधी फवारणी मार्गदर्शन, जैविक शेती या सर्व उपक्रमांना राबविण्यात येते. गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच ज्योती गौतम कांबळे यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव, महिला मंडळ, बचत गट, नवचैतन्य बहुद्देशीय संस्था आणि ग्रामस्थ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.

Web Title: Shiroli Water Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.