शिवसेनेचे भाजपाविरोधी 'पोस्टर वार', युतीत राहून धोरणावर जाहीर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 03:55 PM2018-02-02T15:55:43+5:302018-02-02T16:56:09+5:30
राज्यातील शिवसेना भाजपा युतीमध्ये उघड उघड धुसफूस सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून सभांमध्ये भाजपाच्या धोरणाचा समाचारही घेतला जातो
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : राज्यातील शिवसेना भाजपा युतीमध्ये उघड उघड धुसफूस सुरू आहे. शिवसेना नेत्यांकडून सभांमध्ये भाजपाच्या धोरणाचा समाचारही घेतला जातो. आता हे युद्ध रस्त्यावर आले असून यवतमाळात शिवसेनेने भाजपाच्या धोरणावर जाहीर टिका करणारे फलक लावले आहे. यावरून शिवसेना भाजपला कमी दाखवण्याची कोणतीच संधी सोडण्याच्या तयारीत दिसत नाही. जिल्ह्यातील शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून पुरेपूर प्रयत्न झाले आहेत. सहपालकमंत्रीपद देवून शिवसेनेला सत्तेतही दुय्यम स्थानावर ठेवण्यात आले. तेव्हापासूनच पक्षांतर्गत वादावादी सुरू आहे.
आता शिवसेनेने फलकबाजी करत भाजपा विरोधी मोहीमच उघडल्याचे दिसून येते. काश्मिरातील लष्करी हल्ल्याचा हवाला देत शिवसेनेने भाजपाच्या देशभक्तीचा फोलपणा दाखवून दिला आहे. ‘हा आपला भाजपा’ या मथळ्याखाली भाजपा व पिडीपा सरकारने काश्मिरात लष्करी अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हे नोंदविल्याची घटना ठळकपणे मांडली आहे. तर याच फलकावर दुस-या बाजूला महाराष्ट्रात शिवसेनेच्या अखत्यारित असलेल्या परिवहन मंडळाकडून राबवली जात असलेली दिवंगत बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची जाहिरात करण्यात आली आहे. शहीद कुटुंबातील एकाला एसटी महामंडळात नोकरी व प्रवासातील सवलतीची घोषणा यातून करण्यात आली आहे. शिवसेनेने शहीद सन्मान योजनेचा आधार घेत भाजपाच्या कश्मिरातील लष्कराविरोधातील कारवाईचा एक प्रकारे निषेध केला आहे.
राज्यात अनेक दिवसांपासून मध्यावधी होणार याचे संकेत दिले जात होते तर भाजपासोबत सत्तेत राहून शिवसेना नेहमीच विरोधकाची भूमिका पार पाडत होती. आता शिवसेनेची उघड भूमिका जाहीर झाली असून कुठल्याही मुद्यावर भाजपाला गल्लीतही सोडायचे नाही हा अजेंडा राबविला जात आहे. यातूनच शहरात फलकबाजी उधाण आले असून भाजपाचा जाहीर निषेध करणारे फलक शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व समस्त शिवसेना पदाधिकारी यांच्या नावाने लावण्यात आले आहे.
भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष शिवसेनेने फलकबाजीच्या माध्यमातून केलेले आक्रमण स्थानिक भाजपा कोणत्या पद्धतीने परतवून लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष जनहिताचा कळवळा दाखवत असले तरी प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणा नियंत्रणाबाहेर असल्याने सर्वसामान्यांची कामे होताना दिसत नाही. जाहीर केलेल्या घोषणाची पूर्तताही अपवादानेच झालेली पाहावयास मिळते. आता सेनेला शह देण्यासाठी भाजपा कोणता डाव खेळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.