‘एसटी’च्या सेवानिवृत्तांना आता दोन ऐवजी सहा महिने मोफत प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 03:01 PM2018-12-19T15:01:20+5:302018-12-19T15:11:38+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती.
विलास गावंडे
यवतमाळ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती. आता मोफत प्रवासाचे चार महिने वाढवून सहा महिने करण्यात आले आहे. बारमाही मोफत प्रवास पास मिळावी यासाठी सेवानिवृत्तांनी लढा उभारला होता.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 1 जून 2018 रोजी कामगारांना वेतनवाढीसोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत पासची मुदत सहा महिने करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. मात्र परिपत्रक जाहीर झाल्याशिवाय योजनेची अंमलबजावणी होत नाही. आता महाव्यवस्थापक माधव काळे यांनी मोफत पासचे परिपत्रक जाहीर केल्याने राज्यभरातील 43 हजार सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेले, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी सहा महिन्यासाठी मोफत प्रवास पास दिली जाणार आहे. मात्र जुलै ते फेबु्रवारी या कालावधीसाठीच ही पास असणार आहे. शिवाय साध्या बसमधूनच प्रवास करता येणार आहे. निमआराम गाडीतील भाड्याचा फरक भरून दिल्यास या बसमधून प्रवास करता येणार आहे. एका बसमध्ये दोन पासधारकांनाच एंट्री मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी व पती किंवा पत्नी अशा दोघांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नात्यातील इतर कुठल्याही व्यक्तीने प्रवासाचा पयत्न केल्यास पास जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
दुसरा पास मिळणार नाही
लाभधारकांना मोफत पासची चांगली जपणूक करावी लागणार आहे. एकदा दिलेला पास खराब किंवा गहाळ झाल्यास त्या वर्षाच्या उर्वरित काळासाठी दुसरा पास दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघातप्रसंगी इतर प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीही पासधारकांना नियमानुसार दिल्या जाणार आहे. मोफत पासमुळे सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सेवानिवृत्तांच्या मोफत पासचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी मागील 13 वर्षांपासून लढा उभारण्यात आला आहे. महामंडळाने चार महिने कालावधी वाढविला. बारमाही मोफत प्रवास पासची आमची मागणी होती. चार महिने वाढल्याने आम्ही समाधानी आहोत.
- भास्कर भानारकर, अध्यक्ष, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, यवतमाळ