पूरसंरक्षक निधी केला शाळेच्या भिंतीवर खर्च
By admin | Published: November 2, 2014 10:41 PM2014-11-02T22:41:21+5:302014-11-02T22:41:21+5:30
महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून वेगळाच प्रकार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतीच्या
धनोडा : महागाव तालुक्यातील पोहंडूळ येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून वेगळाच प्रकार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या पूरसंरक्षण भिंतीच्या निधीचा गैरवापर करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनीच आपल्या फायद्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, पुसद, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती, विभागीय आयुक्त आदी सर्वांना या संदर्भात निवेदने पाठविली असली तरी याबाबत कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अतुल बावणे यांच्यासह नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पोहंडूळ येथील नाल्याच्या पूरसंरक्षक भिंतीचा निधी चक्क शाळेच्या संरक्षण भिंतीवर खर्च करण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही ही चौकशी नंतर कुठे दडपण्यात आली हे कळायला मार्ग नाही.
महागाव तालुक्यातील ज्या ज्या गावांना नदीपासून धोका आहे अशा गावांसाठी शासनाने संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर केला. परंतु यामध्येही गैरप्रकार झाला. पोहंडूळ येथील संरक्षक भिंतीचा निधी इतरत्र वळविण्यात आला. हा निधी कुणाच्या आदेशावरून वळविण्यात आला हे कळायला मार्ग नाही. ज्या गावांना नदी-नाल्यांचा धोका आहे अशा गावांसाठी पूरसंरक्षक भिंत बांधकामासाठी महसूल व पुनर्वसन विभागाने ग्रामपंचायतीच्यावतीने ठराव पाठवावा, असे शासनाचे निर्देश होते. यानुसार कारवाई होऊन अनेक गावातील नाल्यांवर पूरसंरक्षक भिंत बांधकाम करण्यात आले. मात्र पोहंडूळ येथे तसे घडले नाही. गावाशेजारी नाल्यावर संरक्षक भिंत असावी म्हणून ग्रामपंचायतीने ठराव घेतला.
त्यासाठी २०१३-१४ मध्ये १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. दरम्यान हा निधी खर्च करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०१४ होती. परंतु हा निधी नाल्याच्या भिंतीवर खर्च न होता इतरत्र वळविण्यात आला. ही भिंतच बांधली न गेल्यामुळे नागरिकांना पाण्याचा धोका कायम आहे. उल्लेखनीय म्हणजे या कामाचे मोजमाप करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वत: उपस्थित होते. हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अतुल बावणे यांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांच्या तक्रारीची दखलच घेतल्या गेली नाही. अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन दोषींवर कारवाई न केल्यास याचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे अतुल बावणे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)