एसटी चालकाची दिव्यांग मुलगी दगावली; मृतदेहासह दिग्रस आगारात कुटुंबीयांचा ६ तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 04:11 PM2022-05-27T16:11:38+5:302022-05-27T16:13:52+5:30
२३ मे रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी किशोर यांनी आगार व्यवस्थापक संदीप मडावी यांच्याकडे रजेची मागणी केली. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक रजा नाकारल्याचा आरोप आहे.
दिग्रस (यवतमाळ) : येथील एसटी महामंडळाच्या आगारात कार्यरत एका चालकाची दिव्यांग मुलगी गुरुवारी सकाळी ९ वाजता दगावली. याला आगार व्यवस्थापक कारणीभूत असल्याचा आरोप करून कुटुंबीय आणि वाहक व चालकांनी मुलीचा मृतदेह आगारात आणून तब्बल ६ तास ठिय्या आंदोलन केले. त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. वाहक-चालकांनी सकाळपासून आगार बंद ठेवला.
स्नेहा किशोर राठोड (१३) असे मृत दिव्यांग मुलीचे नाव आहे. तिचे वडील किशोर लच्छमा राठोड हे मूळ तिवरी येथील रहिवासी असून सध्या ते चिंचोली येथे वास्तव्यास होते. स्नेहा ही दोन्ही पायांनी दिव्यांग व मानसिक रुग्ण होती. २३ मे रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी किशोर यांनी आगार व्यवस्थापक संदीप मडावी यांच्याकडे रजेची मागणी केली. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक रजा नाकारल्याचा आरोप आहे. त्यामुळे मुलीच्या मृत्यूस आगार व्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप किशोर राठोड यांनी केला.
राठोड हे मागील १७ वर्षांपासून दिग्रस आगारात कार्यरत आहेत. आगार व्यवस्थापक संदीप मडावी, रवी जाधव (टी.सी), उईके (एटीआय) हे वैयक्तिक व्देष भावनेने मागील ५ वर्षांपासून मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. २५ मे रोजी मुलीच्या प्रकृतीची कल्पना आगार व्यवस्थापकांना देऊन रजेची मागणी करूनही राठोड यांना रजा नाकारली. मात्र, ते निघून गेल्याने गैरहजेरीची नोंद केली. वेळेवर उपचार न झाल्याने अखेर गुरुवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात स्नेहाचा मृत्यू झाला. त्यामुळे राठोड कुटुंबीय व आगारातील वाहक-चालकांनी आगार व्यवस्थापकाविरुद्ध संताप व्यक्त केला. स्नेहाचा मृतदेह आगारात आणून तब्बल ६ तास ठिय्या मांडला.
दिग्रस आगारातून एकही बस गेली नाही
या घटनेबाबत पोलीस ठाणे व राज्य परिवहन विभाग नियंत्रकाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी उपयंत्र अभियंता प्रताप राठोड, कामगार अधिकारी सुनील मडावी, सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर, सुरक्षा निरीक्षक दीपक लोखंडे, सहायक सुरक्षा निरीक्षक पराग साव उपस्थित होते. तक्रारीतून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे राज्य परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. वाहक-चालकाच्या रोषामुळे सकाळी ८ वाजतापासून आगारातील एकही बस सोडण्यात आली नाही.
पोलिसांत तक्रार दाखल
या घटनेबाबत पोलीस ठाणे व राज्य परिवहन विभाग नियंत्रकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी उपयंत्र अभियंता प्रताप राठोड, कामगार अधिकारी सुनील मडावी, सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर, सुरक्षा निरीक्षक दीपक लोखंडे, सहायक सुरक्षा निरीक्षक पराग साव उपस्थित होते. तक्रारीतून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे राज्य परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. वाहक-चालकांच्या रोषामुळे सकाळी ८ वाजतापासून आगारातील एसटी बस सोडण्यात आली नाही.