12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 05:53 PM2018-09-20T17:53:14+5:302018-09-20T17:54:49+5:30

बारावी विज्ञानसाठी संधी : शिक्षण मंडळाने परीक्षा पद्धतीत केला बदल

Students of 12th year have good news, learn English and give 'Examination Marathi' | 12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून'

12 वीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर, शिका इंग्रजीतून अन् 'परीक्षा द्या मराठीतून'

Next

विनोद ताजने
वणी (यवतमाळ) : ज्यांना मराठी लिहिता-वाचता येते, अशा बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीतून शिकता येत असले, तरी उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी यावर्षीपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. तसे परिपत्रक सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे आवेदनपत्र भरण्याच्या प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रमुख विषयासह 65 विषय इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांची इच्छा असल्यास विषयाची बारावीची परीक्षा मराठीतून देण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी बारावीचा प्रवेश अर्ज भरताना या विषयांपुढे उत्तराची भाषा मराठी, असा उल्लेख 02 हा सांकेतांक निवडून करावयाचा आहे. त्यांना प्रश्नपत्रिकेत त्या-त्या विषयातील जे शास्त्रीय तांत्रिक मराठी शब्द असतात, त्यांच्यासोबत कंसात त्या शब्दाचे इंग्लिश प्रतिशब्द दिले जाणार आहे. उत्तरे लिहिताना विद्यार्थ्याला एखादी मराठी शास्त्रीय, तांत्रिक संज्ञा किंवा मराठी शब्द त्यावेळी आठवला नाही, तर विद्यार्थी मराठी वाक्यात इंग्रजी तांत्रिक संज्ञा लिहू शकतील. मराठी भाषिक विद्यार्थ्याला मराठीतील खोच, पेच, मर्म, तिढा, फिरकी लवकर जाणवते व त्या प्रश्नाचे अधिक, अचूक व अधिक सविस्तर उत्तर लिहून विद्यार्थी त्या विषयात अधिक गुण मिळवू शकतात, असा शिक्षण मंडळाचा तर्क आहे.

शिक्षण मंडळाचा सामान्य गणिताचा प्रयोग फसला
यापूर्वी राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या गणितात कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचलित गणिताऐवजी सामान्य गणित, हा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी या प्रयोगाला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता शिक्षण मंडळाने सामान्य गणित हा विषयच बंद केला आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या या मराठीकरणाच्या प्रयोगालाही विद्यार्थी प्रतिसाद देतील की नाही, हे आवेदनपत्र भरल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Students of 12th year have good news, learn English and give 'Examination Marathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.