नरभक्षक वाघीण ठार, वाघाला ठार मारण्यासाठी 'हे' आहेत नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 10:11 AM2018-11-03T10:11:52+5:302018-11-03T10:13:41+5:30
गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते.
यवतमाळ - गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. या वाघिणीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता.
वाघाला ठार मारण्यासाठी 'हे' आहेत नियम
1) वाघ आणि बिबट्या हे शेड्यूल-1 प्राण्यांमध्ये येतात. त्यामुळे त्यांना कायद्याने सर्वाधिक संरक्षण देण्यात आलं आहे. हे प्राणी अत्यंत आजारी असल्यास किंवा मानवी जीवांना धोकादायक ठरल्यास त्यांना मारण्यास परवानगी आहे.
2) अशा प्राण्यांना मारण्याचे आदेश देण्याचे अधिकार राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना आहेत. त्यासाठी त्यांना हे आदेश देण्यामागील कारणे लिखित स्वरूपात नमूद करणं बंधनकारक आहे.
3) प्राण्याला मारण्यापुर्वी एक समिती स्थापन करावी. त्या समितीकडून प्राण्यावर दैनंदिन लक्ष ठेवले जावे. गरज पडल्यास समितीने तांत्रिक साहाय्यही करावे.
4) या समितीत मुख्य वन्यजीवरक्षकांनी नेमलेली व्यक्ती, व्याघ्रसंरक्षण प्राधिकरणाचे प्रतिनिधी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक पंचायतीचे सदस्य आणि क्षेत्र संचालक किंवा त्यांच्याखालील वनाधिकारी यांचा समावेश असावा.
नरभक्षक वाघिणीची अखेर शिकार; वन विभागाची कारवाई
5) या प्राण्याच्या फिरण्याच्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले जावे. त्याच्या पायांचे ठसे घेतले जावे आणि त्याच्या नोंदी ठेवाव्यात.
6) प्राण्याचा वावर असलेल्या परिसरातून नागरिकांना तात्पुरते दूर हटवावे. गरज पडल्यास त्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून रहिवाशांना सूचना द्याव्यात तसेच त्यांची मदत घ्यावी.
7) प्राण्याचे ठसे, समितीचे पुरावे, प्रत्यक्ष दर्शन, प्राण्यांची विष्ठा आणि केस असे पुरावे गोळा करावे, त्यांचे डीएनए विश्लेषण करावे आणि त्या आधारे नरभक्षक प्राण्याची ओळख पटवावी.
8) पुरेशा पुराव्यांनंतरच वाघांना नरभक्षक ठरविले जावे.
9) नरभक्षक प्राण्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावावे.
...जिथे केली वाघिणीनं पहिली शिकार तिथेच झाला तिचा अंत
10) पकडणे शक्य नसल्यास त्या प्राण्याला ट्रँक्विलाइज (भूल देऊन बेशुद्ध) केले जावे आणि अशा प्राण्याला जवळपासच्या प्राणिसंग्रहालयात सोडले जावे.
11) नियमांमध्ये दिल्यानुसार, सर्व उपाय वापरुन झाल्यानंतर गरज पडत असेल तरच नरभक्षक प्राण्याला मारले जावे.
12) मुख्य वन्यजीव रक्षकांनी प्राण्याला नरभक्षक असल्याचे लेखी द्यावे. वन विभागाच्या संबंधित कौशल्य असलेल्या माणसाकडून बंदुकीची गोळी घालून अशा -प्राण्याला मारले जावे. अशी व्यक्ती विभागात नसल्यास इतर राज्यांतून किंवा संबंधित ठिकाणांहून बोलविली जावी.
13) नरभक्षक वाघाला मारल्याबद्दल किंवा मारण्यासाठी कोणताही पुरस्कार जाहीर केला जाऊ नये.