८० लाखांच्या पायका अपहारात तालुका क्रीडा अधिकारी मोकळेच
By admin | Published: March 15, 2016 04:20 AM2016-03-15T04:20:18+5:302016-03-15T04:20:18+5:30
पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत (पायका) जिल्ह्यात क्रीडांगण विकासाच्या निधीत मोठ्या प्रमाणात
यवतमाळ : पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानांतर्गत (पायका) जिल्ह्यात क्रीडांगण विकासाच्या निधीत मोठ्या प्रमाणात अपहाराचे प्रकरण उघडकीस आले. ८० लाख रुपयांच्या पायका अपहारात सरपंच आणि सचिवावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र निधी वितरणात महत्वाची भूमिका बजावणारे तालुका क्रीडा अधिकारी मात्र मोकळेच आहे. त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतस्तरावर क्रीडा मैदाने साकारण्यासाठी एक लाखाचे अनुदान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून थेट ग्रामपंचायतीला देण्यात आले. यासाठी ग्रामस्तर पायका कार्यकारी समितीच्या नावाने स्वतंत्र बँक खाते काढण्यास सांगण्यात आले. हा निधी दोन टप्प्यात देण्यात आला. पहिल्या टप्प्यात ४८ हजार ९४८ रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ५१ हजार ५२ रुपये देण्यात आले. निकषाप्रमाणे निधीचा विनियोग झाला की नाही, याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी तालुका क्रीडा अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारेच ग्रामपंचायतींना दुसऱ्या टप्प्यातील निधी देण्यात आला. या पद्धतीने जिल्ह्यात ८० ग्रामपंचायतींना ८० लाख रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात ही योजना राबविताना क्रीडा विभागाने जिल्हा परिषद पंचायत विभागाला कुठेच विश्वासात घेतले नाही. आता गावात क्रीडांगणच दिसत नसल्याने चौकशी केली जात आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेवून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले. जिल्हा परिषद बांधकाम- १ व २ च्या कार्यकारी अभियंत्याकडे याची चौकशी सोपविण्यात आली आहे. चार ठिकाणचा अहवाल प्राप्त झाला असून बाभूळगाव तालुक्यातील सावर, पिंपळगाव तालुक्यातील पिंपळगाव, पुसद तालुक्यातील गायमुखनगर, झरी तालुक्यातील माथार्जून येथील सरपंच व सचिवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र सरपंच, सचिवाप्रमाणेच संबंधित तालुका क्रीडा अधिकारीही यात तितकेच दोषी आहेत. पद्धतशीरपणे या अपहारातील कारवाईतून त्यांना सूट दिली जात आहे. केवळ ग्रामपंचायत पातळवरच्या यंत्रणावर कारवाई करून खऱ्या अपहारकर्त्यांना अभय देण्याचे काम या कारवाईतून होत असल्याची चर्चा पंचायत वर्तुळात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अशी आहेत क्रीडांगणे
४यवतमाळ सात, नेर नऊ, बाभूळगाव आठ, कळंब नऊ, पांढरकवडा सहा, दारव्हा आठ, दिग्रस पाच, राळेगाव आठ, मारेगाव दोन, वणी तीन, घाटंजी चार, आर्णी पाच, महागाव एक, पुसद तीन, झरी दोन.