पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:50 PM2018-02-22T21:50:34+5:302018-02-22T21:51:48+5:30

पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे.

Terrain water shortage at Panganga | पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

पैनगंगा तीरावर भीषण पाणीटंचाई

googlenewsNext
ठळक मुद्दे५० गावांना फटका : नळ योजनांच्या विहिरी तळाला, जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमत
उमरखेड : पैनगंगा नदी तीरावरील विदर्भ-मराठवाड्यातील तब्बल ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नळयोजना अखेरच्या घटका मोजत असून कोरड्या पडलेल्या नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे.
उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी तीरावर उमरखेड तालुक्यातील आणि मराठवाड्यातील ५० गावे आहेत. या गावासाठी पैनगंगा जीवनदायी आहे. पैनगंगेच्या पाण्यावर अनेकांचे शेत ओलित होतात. तर बहुतांश गावातील नळ योजनेच्या विहिरी नदी तीरावरच आहे. पूर्वी बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा अलिकडच्या काळात हिवाळ्यातच कोरडी पडते. यंदा तर अपूऱ्या पावसाने पैनगंगेला पूर ही गेला नाही. परिणामी हिवाळ्यातच पैनगंगा करोडी पडली. त्यामुळे भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोलीसंगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, देवसरी, काटखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गाजेगाव, कावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
डिसेंबर महिन्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने पाणी टंचाईची चाहूल लागली होती. परंतु या दोन महिन्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रभावी उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी आता फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिक करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत इसापूरचे पाणी नदी पात्रात सोडले नाही. धरणाचे पाणी शहरांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पैनगंगा कोरडी पडल्याने या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे.
शासनाच्या विरोधात एल्गार
पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गुरुवारी नदी तीरावरील बोरी येथे विदर्भ-मराठवाड्यातील नागरिकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते. नागरिकांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी शासनाने पैनगंगेच्या पात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाई असतानाही प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने रोष व्यक्त केला. आमदार नागेश पाटील यांनी जनभावना लक्षात घेता शासनाच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याचे सांगितले. या बैठकीला पांडुरंग देवसरकर, तुकाराम माने, विठ्ठलराव वानखेडे, भगवान माने, धनंजय माने, डॉ. वसंतराव खंदारे, सुदर्शन रावते, प्रसाद माने, वामनराव वानखेडे, श्रीधर देवसरकर, मदन जाधव, रामराव पाटील, दादाराव पाटील, राजू माने उपस्थित होते.

Web Title: Terrain water shortage at Panganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.