काय सांगता.. चक्क धुरकऱ्याविना सर्जा-राजा करतात मशागत; नागरिकांत कुतूहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 11:11 AM2022-06-10T11:11:41+5:302022-06-10T11:21:51+5:30
या अनोख्या बैलजोडीला शेताच्या तासात सोडले की, त्यांना धुरकऱ्याची गरज नाही. ही सर्जा राजाची जोडी स्वत:च नांगरणी, सारे काढणे, फणी मारणे ही कामे करतात.
वणी (यवतमाळ) : अलिकडे यंत्राने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी अनेक शेतकरी बैलांच्या मदतीने शेतीची मशागत करतात. वणी तालुक्यातील निळापूर येथील एक शेतकऱ्याची बैलजोडी सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे. या अनोख्या बैलजोडीला शेताच्या तासात सोडले की, त्यांना धुरकऱ्याची गरज नाही. ही सर्जा राजाची जोडी स्वत:च नांगरणी, सारे काढणे, फणी मारणे ही कामे करतात.
स्वप्निल शनिदेव कळसकर या युवा शेतकऱ्याने त्याच्या बैलजोडीला तसे प्रशिक्षणच दिले आहे. स्वप्निलकडे २० एकर शेती आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने नवीन बैलजोडी घेतली. त्यांचे सर्जा-राजा असे नामकरणही करून टाकले. या बैलजोडीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या स्वप्निलने हळूहळू त्यांना शेतातील कामात पारंगत केले. आता या बैलजोडीला शेतीच्या तासात सोडले की, ही सर्जा-राजाची जोडी नांगरत शेताच्या पुढच्या टोकाला सराईतपणे पोहचते. हे करताना कुठेही चूक होऊ देत नाही.
मुक्या प्राण्यांपर प्रेम केले की, तेदेखील आपल्याला जीव लावतात. माझ्याकडे असलेल्या यापूर्वीच्या बैलजोड्याही याच पद्धतीने काम करायच्या.
- स्वप्निल कळसकर, शेतकरी, निळापूर.