यवतमाळ जिल्ह्यात ओले संकट; पुराच्या भीतीने आर्णी तालुक्याने जागून काढली रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:21 AM2018-08-17T10:21:36+5:302018-08-17T10:32:04+5:30
गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली.
हरिओमसिंह बघेल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री
पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली. सोशल मिडियावरून सतत जागोजागीच्या अपडेटस एकमेकांसोबत शेअर करीत नागरिक एकमेकांना धीर देत सकाळ होण्याची वाट पहात जागत होते.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघाड न दिल्याने अनेक प्रवासी जागोजागी अडकून पडले आहेत. गावागावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी शाळा, तहसील कार्यालये व मंदिरात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. पूर येण्याची धास्ती प्रत्येकाच्या मनात असल्याने नागरिक दुकानांसमोर, बसस्थानकांवर समूहांत थांबले होते व वाढत्या पाण्याचा अंदाज घेत होते. रात्री बारानंतर पाण्याचा जोर थोडा कमी झाल्यानंतर या नागरिकांनी थोडासा सुटकेचा निश्वास टाकला.
अरुणावती हे धरण आर्णी गावापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मंगळवारपर्यंत ३५ टक्के भरलेले होते. गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत त्याने ६८ टक्क्यांची पातळी गाठली होती. अरुणावती व पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या राणीधानोरा, कवठाबाजार, कोसदनी, मुकींदपूर, साकूर, आसरा या गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. गावात पाणी शिरल्याने दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली तर धरणाचे गेट उघडले जातील आणि पूर येऊन आपले गाव बुडेल या धास्तीने अनेक दुकानदार रात्रभर दुकानांच्या छतांवर बसून राहिले. वॉटसअप व सोशल मिडियावरून गावोगावचे नागरिक आपापल्या गावातील स्थिती व फोटो एकमेकांसोबत शेअर करीत होते.
शुक्रवारी सकाळी पाण्याचा जोर बराच कमी झाला असल्याने पाणी झपाट्याने ओसरू लागले आहे. पावसानेही उघडीप दिली असून, वाहतूक सुरू झाली आहे.