मोडक्या घरकुलात शाळेचा संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:03 PM2018-08-23T22:03:44+5:302018-08-23T22:04:47+5:30
घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे. पाच वर्गांची शाळा दोन खोल्यांच्या घरकुलात भरतेय अन् घरकुल मिळालेला गरीब घरासाठी धडपडतोय.
एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा डांगोरा पिटणारा शिक्षण विभाग दुसरीकडे शाळेला साधी इमारत देण्यात ही अपयशी ठरत आहे. जिल्हा परिषदेपासून अवघ्या तीन-चार किलोमीटरवरील गोधनीलगतच्या श्रमिकनगरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. पण या शाळेला इमारत नाही. २०१३ पासून येथील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती जागेची मागणी करीत आहे. तरीही दाद मिळत नाही. विशेष म्हणजे, सर्वशिक्षा अभियानातून शाळा बांधकामासाठी निधीही मंजूर झालेला आहे. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सीईओ, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली. मात्र सर्वेनंबर ३०/१ मधील ५ हजार चौरसफुटाच्या या जागेचा प्रस्ताव केवळ सीईओंकडून एसडीओंकडे, एसडीओंकडून तहसीलदारांकडे आणि तहसीलदारांकडून भूमि अभिलेख उपअधीक्षकांकडे फिरत आहे.
जागेची मागणी केली, त्यावेळी या शाळेत २५ मुले होती. आता १९ विद्यार्थी आहेत. विलास दुधे नामक गावकऱ्याला मिळालेल्या घरकुलात ही शाळा भरविली जात आहे. परंतु, घरकुलाचे भाडेही वेळेत दिले जात नाही. आता घरकुल मालकही घर रिकामे करून मागत आहे. त्यामुळे शाळा कुठे भरणार, हा प्रश्न चिमुकल्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पहिली ते पाचवी असे वर्ग असून येथे केवळ एकच शिक्षक आहे. त्यामुळे श्रमिकनगरातील मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.