कारगील युद्धाचा झुंझार नायक येतोय यवतमाळात
By admin | Published: December 25, 2015 03:20 AM2015-12-25T03:20:24+5:302015-12-25T03:20:24+5:30
भारतीय अस्मितेवर घाला घालणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांचे शिर कापून त्यावर तिरंगा फडकवणारा झुंझार योद्धा यवतमाळात येतोय.
रक्ततुला होणार : मिरवणूक काढून देणार तरुणांना प्रेरणा, जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबियांचा करणार सत्कार
यवतमाळ : भारतीय अस्मितेवर घाला घालणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांचे शिर कापून त्यावर तिरंगा फडकवणारा झुंझार योद्धा यवतमाळात येतोय. महावीर चक्र विजेते दिगेंद्र कुमार असे या महानायकचे नाव. यवतमाळ जिल्ह्यातील शहीदांच्या परिवारांचा त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे आणि यवतमाळकरही रक्त देऊन दिगेंद्र कुमार यांची रक्ततुला करणार आहेत. देशभक्तीने ओतप्रोत असलेला हा प्रेरक सोहळा २७ डिसेंबरला नंदुरकर विद्यालयात होत आहे.
कारगील युद्धाच्या कहाण्या टीव्हीवर आणि वृत्तपत्रांतून यवतमाळकरांनी समजून घेतल्या. पण दिगेंद्र कुमार या लढाईचा क्षणन्क्षण आपल्या अनुभवातून जिवंत करणार आहेत. दोन तास ते यवतमाळकरांशी संवाद साधतील. गुरुवारी पत्रकार परिषदेत दिगेंद्र कुमार यांच्या शौर्याची हकीगत डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी विशद केली.
दिगेंद्र कुमारांचा महापराक्रम
कारगील युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात बर्फ पडू लागल्याने भारतीय आणि पाकिस्तानी असे दोन्ही बाजूचे सैन्य आपापल्या हद्दीकडे माघारी परतू लागले होते. पण पाकिस्तानी सैन्याने अचानक कारगीलच्या शिखरावर आपला झेंडा फडकवला आणि शिखर ताब्यात घेतले. या कटामुळे भारतीय लष्कर बिथरले. मोजक्या २० कमांडोवर हे शिखर पादाक्रांत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यात दिगेंद्र कुमार होते. रणनीती ठरली. रशियन पद्धतीची हलकी दोरी आणि खिळे घेऊन दिगेंद्र रात्रीच्या अंधारात एकटेच शिखरावर चढून गेले. त्यांनी तयार केलेल्या मार्गावरून नंतर इतर १९ कमांडो आले. तेथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात जसे पाकिस्तानी सैनिक यमसदनी गेले, तसे १९ भारतीय कमांडोही धारातिर्थी पडले. एकमेव दिगेंद्र कुमार शत्रूच्या चार गोळ्या झेलूनही लढत राहिले. शेवटचा पाकी जवान ठार करूनच ते थांबले. त्यानंतर जखमी अवस्थेतच ते शिखराखाली आले अन् तिरंगा घेऊन पुन्हा वर चढले. तेथे बर्फामुळे झेंडा रोवणे अशक्य झाले तेव्हा ठार केलेल्या पाकी सैनिकाचे शिर कापून त्यातच त्यांनी तिरंगा रोवला व फडकवला. पूर्णपणे निर्मनुष्य झालेल्या शिखरावर दिगेंद्र कुमार अर्धमेल्या स्थितीत होते. काही वेळानंतर जेव्हा अमेरिकन लष्कराचे विमान या शिखरावरून गेले तेव्हा त्यांना तिरंगा फडकताना दिसला आणि भारत जिंकल्याची वार्ता जगभराला आपसूकच कळली. दिगेंद्र कुमार यांचे आजोबाही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत होते. फक्त आवाजाची चाहूल घेऊन अचूक नेम साधण्यात दिगेंद्र कुमार निष्णांत आहेत. श्रीलंकेतील अतिरेक्यांनी बंदी बनविलेल्या ३४ भारतीय सैनिकांची सुटका त्यांनी लिलया केली होती. अशा या महानायकाला भेटण्याची संधी यवतमाळकरांना रविवारी मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सामाजिक गौरव व कला-क्रीडाविष्कार सोहळा
डॉ. भाऊसाहेब नंदूरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवारी सत्चिकित्सा प्रसारक मंडळातर्फे सामाजिक गौरव व कलाक्रीडाविष्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नंदूरकर विद्यालयाच्या सत्यसाई विद्यानगरीत होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, डॉ. सतीश खोडे, प्राचार्य डॉ. प्रकाश नंदूरकर, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश जाधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी दिगेंद्र कुमार यांचा सत्कार होईल. तसेच जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या परिवारांचा, मैदानी स्पर्धा गाजविणाऱ्या प्रौढ खेळाडूंचा, नेत्रदान-देहदान करणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा, ५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे पुरुष आणि १० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या महिलांचा महावीर चक्र विजेते दिगेंद्र कुमार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह ‘यवतमाळ रक्तदाता वेबसाईट’चे उद्घाटनही यावेळी होणार असल्याची माहिती डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी पत्रपिरषदेत दिली.